

वडूज : खटाव तालुक्यातील गोरेगाव (निमसोड) येथील पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध वडूज पोलीस व एन. डी. आर. एफ.ची टीम दिवसभर घेत होती. मात्र रविवारी दिवस मावळला तरी त्यांचा शोध लागला नव्हता.
अंबवडे-गोरेगाव रस्त्यावरील असणार्या पुलावरून शनिवारी पाणी वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने अंबवडे येथील सुरेश रघुनाथ गायकवाड (वय 53) हे टेलर व्यावसायिक वाहून गेले होते. ही घटना समजताच पोलिस व महसूल प्रशासनाने पहाटेपर्यंत त्यांचा शोध घेतला. परंतु त्यांना यश न आल्याने कोल्हापूर येथील एन. डी. आर. एफ.च्या रेस्क्यु टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील पाच जवानांनी बोटीच्या सहाय्याने संपूर्ण दिवसभर शोध घेतला.
त्याचबरोबर पोलिस निरीक्षक घनशाम सोनवणे तसेच बीट अंमलदार महेश काटकर, हवालदार शिवाजी खाडे, गणेश शिरकुळे व इतर नऊ जवान जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील ड्रोनच्या सहाय्याने शोध घेत होते. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.