Satara Rain News | माणगंगेला पूर; आंधळी धरणही भरले

माणच्या 14 गावांचा संपर्क तुटला...
Satara Rain News |
वावरहिरे ते डंगिरेवाडी या रस्त्यावर पुलाचे काम सुरू होते. जोरदार पावसाने व ओढ्याला आलेल्या पुराने नवीनच केलेले डांबरीकरण उचकटून टाकले.Pudhari Photo
Published on
Updated on

दहिवडी : माण तालुक्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी पावसाने ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. पाणी रस्त्यावर आल्याने आंधळी ते मलवडी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तर दुसरीकडे दहिवडी-फलटण रस्त्यावर वडगाव येथे प्रचंड पाणी ओढ्यातून आल्याने काही काळ रस्ता बंद ठेवण्यात आला. माण तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

तालुक्यात सर्वत्र सकाळपासून धो-धो पाऊस कोसळत असून अनेक छोट्या मोठ्या पाझर तलावात पाणी साठू लागले आहे. माणगंगा नदी दुथडी भरुन वाहत असून म्हसवडमध्ये मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी वाढले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. माणगंगा नदीवर असलेले आंधळी धरण पावसाळ्या पूर्वीच भरले असून सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. तालुका जलमय झाला आहे.

गेले काही दिवस माणमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. माणच्या पश्चिम भागाला तर पावसाने झोडून काढले आहे. कुळकजाई, शिरवली या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने गावोगावी असलेले ओढ्यावरील बंधारे भरून पाणी खाली येऊ लागल्याने मलवडी परिसरातून पाणी नदीतून आंधळी धरणात येत आहे. माण तालुक्याची वरदायिनी ठरत असलेल्या आंधळी धरणात मोठा पाण्याचा फ्लो डोंगर दर्‍यातून सुरू आहे. आंधळी धरण भरून सांडव्यावरून पाणी पडू लागले आहे.

आंधळी गावाजवळ असणार्‍या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने मलवडी ते आंधळी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने दहिवडी-फलटण रस्त्यावरील वडगाव येथे पुलावरून पाणी गेल्याने दहिवडी-फलटण रस्ताही बराच वेळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

सोकासन, मार्डी, वावरहिरे, मोही, बिजवडीसह अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पावसाने शेतातच मोठी तळी साठली आहेत. शेती पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. पावसाळ्यापूर्वीच परकंदी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. उन्हाळ्यात तलाव भरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. माण तालुक्यातील बहुतांशी ओढ्यांना एकाच दिवशी पूर आल्याचे चित्र पहिल्यांदाच बघायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news