

फलटण : फलटण शहरासह तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून शहरासह ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे. बाणगंगा धरण उन्हाळ्यात प्रथमच ओव्हर फ्लो झाले. पावसाने तांडव केल्याने 16 गावांचा संपर्क तुटला आहे. सुमारे 123 कुटुबांचे अन्यत्र स्थलांतर करावे लागले.
पूरस्थितीमुळे हाहाकार उडाला असून जनजीवन कोलमडून पडले आहे. तालुक्यातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. ठिकठिकाणी पूल, रस्ते पाण्याखाली गेले आहे. काही रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. बाणगंगेच्या पुरामुळे शनिनगर ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले तर कोळकीजवळ ओढ्याच्या पुरात वाहून जाणारा दुचाकीस्वार बचावला.
फलटणच्या इतिहासामध्ये उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस फलटणकरांनी अनुभवला नव्हता. दमदार पावसामुळे शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गटारी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच गल्लीबोळातील रस्ते जलमय झाले आहेत. मंगळवार पेठ, पवार गल्ली, संजीवराजेनगर, नरसोबा नगर, मलटणसह अनेक ठिकाणचा परिसर जलमय झाला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. शहरासह खेड्यातील अनेक गावातील घरांमध्येही पाणी शिरले. दमदार पावसापुढे लोक हतबल झाले आहेत.
शहरातील सखल भागामध्ये पाणी साचण्याबरोबरच रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी प्रशासनाने केलेल्या निकृष्ट कामांचे पितळ उघडे झाले आहे. तसेच अपूर्ण अवस्थेतील विकासकामांच्या ठिकाणी चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. धुवाँधार पावसामुळे बाणगंगा धरण भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. बाणगंगा नदीला मोठा पूर आला आहे.
ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. जाधववाडी, गिरवी येथील इनाम तलावाच्या खालील पूल वाहून गेला आहे. तर सोनवडी येथील ओढ्याला पूर आल्यामुळे फलटण-शिंगणापूर रस्ता बंद आहे. सरवडी तडवळे रस्ता ओढ्याला आलेल्या पुरामुळे बंद आहे. शिंदेवाडी खुंटे रस्ता पुरात वाहून गेल्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
संपूर्ण तालुक्याशी गिरवीचा संपर्क तुटला आहे. गिरवी, जाधववाडी तसेच फलटण रस्ता ओढ्याला आलेल्या पुरामुळे बंद करण्यात आला आहे. जावली-फलटण रस्ताही पुरामुळे बंद झाला आहे. खडकी मलवडी, कुरवली येथेही पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जानुबाईच्या ओढ्याला पाणी आल्याने बोडकेवाडी येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मांगोबा तसेच खटके वस्ती जवळील ओढ्याला पाणी आल्याने फलटण-आसू वाहतूक बंद आहे. भाडळी खुर्द व दुधेबावी येथील ओढ्याला पूर आल्याने दहिवडीकडे जाणारी वाहतूकही बंद आहे. मिरगाव या ठिकाणच्या ओढ्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
फलटण-पंढरपूर मार्गावर विडणी, वाजेगाव, राजुरी बरड या ठिकाणी सेवा रस्त्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. फलटण सस्तेवाडी कांबळेश्वर रस्ता ओढ्याला आलेल्या पुरामुळे बंद आहे. मिरढे येथील ओढ्याला पूर आल्याने वाहतूक बंद आहे. खडकेश्वर येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने शहरातून पूर्वेकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जीव धोक्यात घालून वाहनधारक पूल ओलांडत होते.
फलटण येथील घरात, दुकानात व जिममध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच खुटे हनुमाननगर येथील अनेक घरात पाणी शिरले. तर मठाचीवाडी, बोडकेवाडी, तांबवे, मुळीकवाडी, वाघोशी, कापसी, मांडव खडक येथील घरांच्या भिंती कोसळल्या. तरडगाव येथे घराची भिंत कोसळून एका शेळीचा मृत्यू झाला. तर जिंती येथे गाईचा मृत्यू झाला. मलठण येथे घराची भिंत कोसळून दुचाकीचे नुकसान झाले. तसेच वाजेगाव निंबळक रस्त्यावर झाड पडले. दरम्यान, फलटणच्या मुधोजी प्राथमिक शाळेत पुरग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यात आला असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
फलटण तालुक्यातील जिंती -गिरवी, पाडेगाव -आसू, गिरवी-कोराळे, पिंपळवाडी -फडतरवाडी व जिंती-कुरवली, नांदल -होळ, फडतरवाडी-सोमंथळी, फलटण-आसू, सासकल-सांगवी, शेनवडी-निंबोडे,दुधेभावी-राजाळे हे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील होळ, सोमंथळी, सरडे, गोखळी, मागोबामाळ, सोनवडी बु॥, मिरढे, कोथळे, निंभोरे, नांदल, रावडी, मुरुम, गिरवी, वांद्रे वस्ती, फडतरवाडी व चौधरवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.
फलटण तालुक्यातील गुणवरे 20, आढावस्ती गुणवरे 15, गोखळीपाटी गोखळी 20, हनुमंतवाडी 18, सरडे येथील 20 पूरग्रस्त बाधित कुटुंबे तर फलटणमधील नदी तीरावरील 30 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.