

वाई : कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाईच्या ग्रामदैवत असलेल्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीला चरणस्पर्श केला. स्थानिक समजुतीनुसार गणरायाच्या चरणाला कृष्णामाईचा स्पर्श हे समृद्धी, भरपूर पाऊस आणि जलसंपन्नतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे यंदा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
धोम धरणातून शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजता ७,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. पुराचे पाणी थेट ढोल्या गणपती मंदिरापर्यंत पोहोचून मंदिराला वेढा पडला. नदीपात्रात पाणी वाढल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना पुराच्या पाण्यात उतरून दर्शन घेण्यास बंदी घातली आहे. तरीही अनेक भाविक मंदिर परिसरात येऊन सुरक्षित अंतरावरून गणरायाचे दर्शन घेत आहेत.
पुराचे पाणी मंदिर परिसरातील अनेक दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागली. त्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलवला असला, तरी व्यवसाय ठप्प झाल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महागणपती मंदिराशेजारील पुलाची उंची वाढवावी, तसेच पुलावरील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.
पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक वळवली
महापुरामुळे कृष्णा नदीतील जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाहून गेल्याने नदीपात्र स्वच्छ होण्यास मदत झाली आहे. दुसरीकडे, गणपती मंदिराशेजारील पूल काही काळ पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पर्यायी पुलावर वळवावी लागली. परिणामी, शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.