

वडूज : खटाव तालुक्यात चालू वर्षी परतीच्या मान्सूनची जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. या पावसामुळे गावोगावी शासकीय मालमत्ता व शेतकर्यांच्या शेतातील पिकांची लाखो रुपयांची हानी झाली आहे. तसेच पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
यामध्ये अतिरेकी पाऊस व येरळा नदीच्या महापुरामुळे येरळवाडी धरणाच्या सांडव्याखालच्या बाजूला असणारा बनपुरी रस्त्यावरील पूल पुर्णपणे वाहून गेला आहे. तर वडूज-रहिमतपूर रस्त्याला जोडणार्या नायकाचीवाडी गावच्या पोहोच रस्त्यावरील ओढ्यातील साकव पुलही वाहून गेला आहे. यामुळे दोन-तीन गावातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. बनपुरी येथे तहसिलदार बाई माने यांनी भेट देवून नुकसानीची पाहणी केली. तर नवीन पुलाची तातडीने उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर माजी सरपंच रामभाऊ पाटील, तुकाराम देवकर, शरद देवकर, अशोक घाडगे, सत्यवान पाटोळे, भगवान देवकर, चंद्रकांत देवकर, राजेश देवकर, विजय देवकर, रामचंद्र देवकर, चंद्रकांत पाटोळे, दिपक पाटोळे, अविनाश पाटोळे आदिंच्या सह्या आहेत. वडूज येथील संजयनगर मधील शेतकरी नंदकुमार पवार यांच्या शेतातील दीड एकर कांदा पिक वाहून गेले आहे. तर तीन एकर क्षेत्रातील ऊसाची अतोनात हानी झाली आहे. याशिवाय पेडगांव, वाकेश्वर, सिध्देश्वर कुरोली, वरुड, उंबर्डे, सातेवाडी, गणेशवाडी येथील अनेक शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.