Satara Rain: एल निनोचा अंदाज फोल; पावसाने दक्षिणला संजीवनी

कोरड्या गेलेल्या जूननंतर बदलले चित्र; तलाव-बंधारे तुडुंब, खरीप पिकांना फायदा
Satara Rain: एल निनोचा अंदाज फोल; पावसाने दक्षिणला संजीवनी
Published on
Updated on
वैभव पाटील

उंडाळे : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. हवामान खात्याचा अंदाज आणि जून महिना कोरडाच गेल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यातील दमदार पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दमदार पावसाने कराड दक्षिणमधील डोंगरी विभागातील गावांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांना मोठा फायदा झाला आहे.

जुलै महिन्यामध्ये सरासरीच्या आसपास समाधानकारक पावसाची नोंद झाल्याने विभागातील सर्व बाजार तलाव, पाझर तलाव, बंधारे आणि लहान-मोठी धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद निर्माण झाला आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी तसेच विविध कडधान्यांची पिके सध्या जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत. शेतकरी तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पिकांच्या निगेची आंतरमशागतीची कामे मोठ्या प्रमाणावर करत असून शेत शिवारात सध्या चांगली लगबग दिसून येत आहे.

उंडाळे, घोगाव, जिंती, अकाईवाडी, येणपे, माटेकरवाडी, लोहारवाडी, येळगाव, येवती, तुळसण, पाचुपतेवाडी आदी भागांतील तलाव व धरणे भरल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. समाधानकारक पावसामुळे केवळ खरीपच नव्हे, तर आगामी रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता राहील, अशी आशा व्यक्त होत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटल्याने ग्रामीण विभागातील शेत कऱ्यांमध्ये सध्यस्‍थितीत समाधानाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news