

पाटण : पाटणसह तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पाटण-कोयनानगर रस्ता रुंदीकरणामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाउस, खड्डे व सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीची सातत्याने कोंडी होत आहे.
दरम्यान, कोयना विभागातील वाजेगाव परिसरात रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी मालट्रक चिखलात रुतल्याने अडकून पडला होता. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. उभ्या पावसामध्ये जेसीबीच्या सहाय्याने मालट्रक बाजूला केल्यानंतर कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, रुंदीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम केल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन जखमीही झाले आहेत. त्यामुळे कंपनीने सुरक्षिततेच्या द़ृष्टीने उपाययोजना राबवून लवकरात लवकर रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटणपासून ते कोयनानगर विभागातील संगमनगर (धक्का) पर्यंतचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाटण तालुक्यात सर्वत्रच पावसाची संततधार सुरू आहे. उभ्या पावसातही या रुंदीकरणाचे काम कंपनीकडून सुरू आहे. ठिकठिकाणी कामासाठी रस्त्यात खोदकाम करण्यात आले आहे. पावसामुळे या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाल्याने वाहनांना अंदाज येत नाही.
अवजड वाहने यातून गेल्यास ती हमखास चिखलात अडकत आहेत. जागोजागी रस्ता उकरल्याने या मार्गावरून जाताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. सध्या तरी हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याचे काम करताना सुरक्षिततेच्या द़ृष्टीने कंपनीने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाजेगावच्या परिसरात मालट्रक चिखलात रूतून बसला होता. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने हा ट्रक काढताना अनेक अडचणी येत होत्या. ट्रक रस्त्यावरच अडकल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर जेसीबीच्या साहाय्याने हा मालट्रक बाजूला करण्यात आला.