

मसूर : कराड तालुक्यातील हणबरवाडी गावावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ढगफुटी सद़ृश पावसाचा अक्षरशः कहर झाला. अवघ्या दीड ते दोन तासांत झालेल्या या अतिवृष्टीमुळे गावातील ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. मागील दहा वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. या पावसामुळे पिकांचा अक्षरशः चुराडा केला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.
जोरदार वादळासह कोसळलेल्या या पावसामुळे उसाचे पीक आडवे झाले आहे. तर काढणीस आलेल्या कडधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच खरीप हंगामात उघडीप आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे मशागतीची कामे करण्यात अडथळे आले होते. यावर मात करत शेतकर्यांनी पिके घेतली असून आता काढणीला आलेले पीक जमिनीतच नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. शेतकर्यांच्या डोळ्यांदेखत त्यांचे घाम गाळून उभे केलेले पीक वार्याने आणि पावसाने उद्ध्वस्त होताना पाहून त्यांच्या व्यथा आणखी वाढल्या आहेत. शेतकरी मात्र केवळ पावसाच्या पाण्यानेच नव्हे, तर शासनाच्या उदासिनतेनेही हतबल झाले आहेत.
उत्पादन खर्च वाढत असून खत, बियाणे, औषधे यांचे दर प्रचंड वाढले आहेत. मजुरांचे दरही वाढल्याने शेतीचा खर्च प्रचंड वाढतो आहे, पण बाजारात पिकाला मिळणारा भाव खर्चापेक्षा नेहमीच कमी असतो. महागाईच्या झळा, वाढलेले कर्जाचे ओझे आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अक्षरशः कोलमडून पडले आहेत. दिवसेंदिवस तोट्यात चाललेली शेती आता शेतकर्यांसाठी ओझे ठरत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी ढगफुटी या सततच्या संकटांनी शेतकर्यांचा पिच्छा सोडलेला नाही.
शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकर्यांकडे पर्याय उरलेला नाही. हणबरवाडीतील गुरुवारचा पाऊस हा केवळ एका गावाचा प्रश्न नसून संपूर्ण परिसरातील शेतकर्यांच्या संकटमय वास्तवाचे प्रतीक आहे. जर शासनाने वेळेत दिलासा दिला नाही, तर शेती हा व्यवसाय शाश्वत राहणार नाही, असे सांगितले जात आहे.