Satara News : सातारा रेल्वेस्थानकातील कामावरून ताशेरे

विभागीय व्यवस्थापकांकडून अधिकारी व ठेकेदारांची झाडाझडती
Satara News : सातारा रेल्वेस्थानकातील कामावरून ताशेरे
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या विविध विकासकामांची पुणे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कामावरून अधिकारी व ठेकेदारांची झाडाझडती घेत त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहणी दौऱ्यात चांगलाच घाम फुटला. त्यांनी जिल्ह्यातील वाठारस्टेशनसह अन्य रेल्वे स्थानकांची पाहणी केली.

मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी सातारा रेल्वे स्थानकातील मुख्य प्रवेशद्वार व परिसर, प्रवाशी प्रतिक्षालय, शौचालय, स्वच्छतागृह, रेल्वे स्थानक सिग्नल यंत्रणा, प्लॅट फॉर्म क्रमांक ४ सह अन्य परिसराची पाहणी केली. त्यांनी स्थानकातील कामांची सद्यस्थिती, कामांचा दर्जा आणि प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. विकासकामे करताना नियोजन, गुणवत्ता राखण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. रेल्वे स्थानकातील बहुतांश कामे बंद आहेत या कामावरून अधिकारी व ठेकेदारांची त्यांनी चांगलीच झाडाझडती घेतली वेळेचे भान राखून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सातारा रेल्वे स्थानकातील कामांच्या प्रगतीबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. कामांमध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर वातावरण मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विकासकामे करताना प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी सातारा रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केल्याने रेल्वेच्या संबंधित विभागाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कितपत होते? विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण होतात का? प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळतात का? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

प्लॅटफॉर्म ४ चा निधी गेला कुठे?

रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेंतर्गत सातारा रेल्वे स्थानकांतील विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामध्ये प्लॅटफॉर्म ४ च्या सोयीसुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी दिला आहे. अद्यापही प्लॅटफॉर्म ४ वर शेडसह अन्य कामे का झाली नाहीत? आतापर्यंत दिलेला निधी कुठे गेला? अशा शब्दात विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी अधिकारी व ठेकेदारांची झाडाझडती घेतली. त्यावेळी अधिकारी व ठेकेदारांचे तू तू मै मै झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news