

सातारा : सातारा रेल्वे स्टेशन सातारा येथे मंजूर झालेले लोहमार्ग पोलिस ठाणे सुरू करण्यात यावे यासाठी दैनिक ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठवला होता. तसेच सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सातारा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम यांनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, विभागीय रेल्वे व्यवस्थापक व लोहमार्गचे पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून सातारा रेल्वे स्थानकात लवकरच लोहमार्ग पोलिस ठाणे होणार आहे.सातारा रेल्वे स्टेशन हे सातारा जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी आहे.
जिल्ह्यातून दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वेने प्रवास करताना जिल्ह्याच्या हद्दीत रेल्वेत प्रवाशांचे साहित्य चोरी झाले अथवा एखादा गुन्हा घडला तर त्या प्रवाशाला मिरज येथे रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जावे लागते. यामध्ये त्या प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक खर्च होतो. मिरज-पुणे दुहेरीकरण मार्गाचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांबरोबर प्रवासी संख्याही वाढणार आहे. पोलिस ठाण्यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यामुळे लोहमार्ग पोलिस ठाणे लवकरच होणार असल्याने ‘पुढारी’च्या लढ्याला यश आले आहे.
सातारा रेल्वे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिस ठाण्याची निर्मिती होण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून सातारा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष व सातारा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे माजी सदस्य विकास कदम यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. सातारा येथे लोहमार्ग पोलिस ठाणे होणार असल्याने सातारा जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर किंवा रेल्वे प्रवासात काही गुन्हे घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी मिरज येथे जावे लागत होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशीही तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत होते.
लोहमार्ग पोलिस ठाणे साताऱ्यात होणार असल्याने रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान घडलेले गुन्हे सातारा येथेच दाखल होणार असल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नवीन पोलिस ठाण्यामुळे लोहमार्ग पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे. तसेच किरकोळ चोऱ्या माऱ्या यासारख्या विविध घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.