

सातारा : सातारा रेल्वे स्थानकातून सातारा शहराकडे येणारी महामंडळाची पहाटे एसटी बस नसल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ही एसटी बस बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांना जादा भाडे देवून सातार्यात यावे लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळेच बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
सातारा शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर माहूली रेल्वे स्टेशन आहे. गेल्या काही महिन्यापासून एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडले आहे.त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सातारा आगारातून पहाटेच्यावेळी एसटी बस रेल्वे स्थानकात येत होती. मात्र, गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ही एसटी बस बंद झाली आहे. रात्री 2.30 वाजता हुबळी, पहाटे 3 वाजून 10 मिनीटांनी महालक्ष्मी, पहाटे 4 वाजता पॉडेचरी दादर चालूक्य एक्सप्रेस, पहाटे 4 वाजता सह्याद्री,पहाटे 4.30 वाजता अजमेर बेंगलोर, पहाटे 5.15 वाजता समर स्पेशल हमसफर यासह लांब पल्ल्याच्या अन्य रेल्वे सातारा रेल्वे स्थानकात थांबत असतात.
त्यामुळे सातार्यात पहाटे उतरणार्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यांना सातार्याकडे येण्यासाठी बसच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने पहाटेच्यावेळी बस सोडल्यास प्रवाशांची सोय होवून महामंडळाला महसूलही मिळेल. एसटीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष घालून सातारा ते माहुली रेल्वे स्टेशनला दिवसा व पहाटेच्यावेळी बसेस सोडाव्यात.
माहूली रेल्वे स्टेशनवरून सातार्यात येण्यासाठी बस वेळेत नसल्याने अनेक प्रवाशी चालत माहूली फाट्यावर येवून तेथून अन्य वाहनाने सातार्यात येत असतात. तर काही प्रवाशी रिक्षांचा पर्याय शोधतात. मात्र, हे रिक्षाचालक मनमानीपणे भाडे आकारणी करत असतात. अनेकदा जादा भाड्यावरून प्रवाशी व रिक्षा चालक यांच्यामध्ये वादावादीचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांची रेल्वे प्रशासन, पोलिस व आरटीओ कार्यालयाने बैठक घेवून किती भाडे घ्यावयाचे याबाबत सूचना देण्याची गरज आहे.