Rahimatpur incident: रहिमतपूर येथे जादूटोण्याला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले

पती व सासू-सासऱ्यांना अटक
 death
death Pudhari
Published on
Updated on

कोरेगाव : जादूटोणा व अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या छळाला कंटाळून 22 वर्षीय पूजा अशोक भोंडवे या विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना रहिमतपूर येथे घडली. याप्रकरणी पती, सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत संगीता रमेश अडागळे (रा. कारी, ता. सातारा) यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती अशोक जालिंदर भोंडवे, सासू मंगल भोंडवे आणि सासरे जालिंदर भोंडवे यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता यांची मुलगी पूजा अशोक भोंडवे (वय 22) हिचे 2021 मध्ये अशोक जालिंदर भोंडवे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून तिला मुलगाच व्हावा, यासाठी सतत दबाव टाकण्यात येत होता. सासरे जालिंदर भोंडवे हे देवदेवस्की करत असल्याने पूजावर अंधश्रद्धाजन्य विधी करण्याचा दबाव टाकण्यात येत होता. लिंबांना टाचण्या टोचणे, नारळावर उभे करणे अशा प्रकारांमुळे तिला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता. तसेच माहेरी येण्यास अडथळे निर्माण करून देवीचा कोप होईल अशी भीती दाखवली जात होती.

दि. 4 एप्रिल रोजी पूजा माहेरी आली असता तिने छळाबाबत माहिती दिली होती. यानंतर दि. 9 एप्रिल रोजी तिला कोल्हापूर येथे देवीच्या दर्शनासाठी नेण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अंधश्रद्धेचे विधी सुरू असल्याचे तिने कुटुंबीयांना सांगितले. वाढत्या त्रासाला कंटाळून त्याच दिवशी रात्री पूजाने गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच पूजाचा मृत्यू झाला. दरम्यान, संशयित तिघांना अटक करून कोरेगाव न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news