

पुसेसावळी : स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पुसेसावळी आणि परिसरातील वंजारवाडी येथे वीज पुरवठ्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पुसेसावळीत अनेक ठिकाणी रस्त्यावरील खराब झालेले विजेचे बल्ब न बदलल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकांना अंधारातून प्रवास करावा लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
दुसरीकडे, वंजारवाडी येथे चक्क उलटी परिस्थिती पाहायला मिळत आहे. या भागात वीज बंद करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आवश्यक तांत्रिक साहित्य नसल्यामुळे येथील वीज पुरवठा वेळेवर बंद करणे शक्य होत नाही. याचा परिणाम म्हणून वंजारवाडीत दिवसाही उजेड आणि रात्रीही उजेड, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. दिवसाही पथदिवे चालू राहत असल्याने विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे.
एकीकडे नागरिक अंधाराचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे विजेची नाहक उधळपट्टी होत आहे. प्रशासनाचे नेमके लक्ष कोठे आहे? असा संतप्त सवाल आता स्थानिक ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. संबंधित विभागाच्या कामात कोणतीही तत्परता नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.