

खटाव : बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी मोहीम राबवून ६७ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून ५४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. कर्णकर्कश सायलेन्सर आणि प्रेशर हॉर्नही जप्त केले.
पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार सदर कारवाई करण्यात आली. पुसेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेख, पोलिस उपनिरीक्षक पुजारी, वाहतूक पोलिस अंमलदार संतोष बागल, पोलिस अंमलदार बापुराव नवत्रे, राहुल जाधव व अविनाश घाडगे यांच्या पथकाने २१ ऑगस्ट रोजी विसापूर फाटा व शिवाजी चौक पुसेगाव येथे विशेष नाकाबंदी केली.
या मोहिमेत बेशिस्त वाहनचालक तसेच कॉलेज व एसटी स्टँड परिसरातील रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार एकूण ६७ केसेस दाखल करुन ५४ हजारांचा दंड वसूल केला. कर्णकर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या सहा वाहनांवर आणि प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या सात वाहनांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली. संबंधित सायलेन्सर व प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले. पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेज परिसरात इतरांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहन चालवणारे रोडरोमिओ, वाहतूक कोंडी व रहदारीस अडथळा निर्माण करणारे वाहनचालक, दारू पिऊन वाहन चालवणारे तसेच मोटारसायकलवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सपोनि नागनाथ खुणे यांनी सांगितले.