Satara Burglary Case: पुसेगावात एकाच रात्री पाच दुकाने फोडली

चोरट्यांचा धुडगूस : ४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास
Satara Burglary Case: पुसेगावात एकाच रात्री पाच दुकाने फोडली
Published on
Updated on

खटाव : पुसेगावमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडून सुमारे ४ लाख ६३ हजार ८५२ रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवार दि. ५ रोजी रात्री दहा वाजल्यापासून रविवार दि. ६ रोजी सकाळी साडेआठपर्यंतच्या काळात चोरट्यांनी पुसेगाव-फलटण मार्गावरील दुकाने लक्ष्य केली. एकाच रात्री पाच दुकानांमध्ये चोऱ्या झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, चोरट्यांनी पोलिसांसमोरच आव्हान उभे केले आहे.

पुसेगाव पोलिस ठाण्यात अब्दुल हारुन शिकलगार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या एएम ऑटो अ‍ॅक्सेसरीज अँड बॉडी पार्ट्स, आकाश भरत जाधव यांच्या सिद्धेश्वर व्हील्स अँड टायर्स, महेश गोपीचंद शिंदे यांच्या बालाजी हार्डवेअर, विजय पंढरीनाथ बर्गे यांच्या स्वराज वॉच आणि संजय शामराव चव्हाण यांच्या हॉटेल साईश या पाच ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला.

एएम ऑटो अ‍ॅक्सेसरीज अँड बॉडी पार्ट्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्लस एलईडी लाईटचे सहा नग, विविध प्रकारचे एलईडी बल्ब, ऑटो अ‍ॅक्सेसरीज, ऑटो एक्सेल व इतर साहित्य, कॅमेरे, फॉग लॅम्प, प्रोजेक्टर तसेच रोकड लंपास केली. या दुकानातून चोरीस गेलेल्या मालाची नोंद सुमारे २ लाख ३३ हजार ७०० रुपये आहे. सिद्धेश्वर व्हील्स अँड टायर्समध्ये चोरट्यांनी योकोहामा कंपनीचे सहा टायर, ब्रीजटोन कंपनीचे चार टायर, सीएट कंपनीचे चार टायर तसेच इतर कंपन्यांचे एकूण २० टायर चोरून नेले.

याशिवाय वायफाय मशीन रावटरही लंपास करण्यात आला. येथील चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ८० हजार असल्याचे नोंदवण्यात आले आहे. बालाजी हार्डवेअरमध्ये चोरट्यांनी दोन ग्राइंडर आणि चार हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केली. स्वराज वॉच या दुकानातून चोरट्यांनी टायटन, सोनाटा, ॲटीक अशा विविध कंपन्यांची महागडी घड्याळे आणि रोकड असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. हॉटेल साईश मधून चोरट्यांनी २ हजारांची रोकड लंपास केली.

अशा प्रकारे अवघ्या एका रात्रीत पाच ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. चोरट्यांनी दुकानदारांची ठिकाणे हेरून नियोजनबद्ध चोऱ्या केल्याचे दिसत आहे. या घटनांमुळे पुसेगाव परिसरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी पोलिसांना आव्हान देत पाच दुकाने फोडल्याने आता पोलिसांसमोर या टोळीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बर्गे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news