Satara Traffic Jam| महामार्गाची सातारा-पुणे लेन ठप्‍प

सुरूर, नागठाणे, आनेवाडी टोल नाक्‍यावरही रांगा : प्रवाशांना मनस्‍ताप
Satara Traffic Jam
पुणे-बंगळूर महामार्गावर सुरूरनजीक वाहनांच्‍या अशा लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या.
Published on: 
Updated on: 

वेळे/नागठाणे : दिवाळीची सुट्टी संपताच पुणे, मुंबई, ठाण्यासह उपनगरांत कामानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर वाहनांचा महापूर उसळला आहे. जिल्ह्यातील महामार्गावर अनेक ठिकाणी कोंडी झाली असून, सुरूर येथे ७ ते ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागठाणेपासून अतीत, काशीळपर्यंत वाहनांची गर्दी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटकातील दिवाळीनिमित्त चाकरमानी कुटुंबीयांसह गावी आले होते. सणासुदीचा आनंद लुटल्यानंतर सुट्ट्या संपल्याने सर्वांचीच कामाच्या ठिकाणी परतण्याची घाई सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुणे-बंगळूर महामार्ग वाहनांनी ओसंडून वाहत आहे. सातारा तालुक्यातील नागठाणे, अतीत आणि काशीळ परिसरात वाहनांची अफाट गर्दी झाल्याने महामार्गावर वाहनांचा महापूर आल्याचे चित्र दिसत होते.

निसराळे फाटा, नागठाणे, अतीत, काशीळ, आनेवाडी टोलनाका, वेळे आणि सुरूर येथे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. याउलट पुण्याकडून साताऱ्याकडे येणारी लेन तुलनेने मोकळी होती. नागठाणेपासून काशीळपर्यंत वाहनांच्या एक ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. कोंडी टाळण्यासाठी काही वाहनधारकांनी सर्व्हिस रोडचा पर्याय स्वीकारला. निसराळे फाटा, हरपळवाडी, सासपडे मार्गे नागठाणे अशी वाहतूक सुरू झाली; मात्र या मार्गावरही वाहनांची गर्दी वाढल्याने सर्व्हिस रोडदेखील जाम झाला. त्यामुळे महामार्गासह पर्यायी मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आनेवाडी टोलनाक्यावर सातारा ते पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. टोलनाक्यापासून पुलापर्यंत तसेच पुढे सुमारे एक ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचबरोबर सुरूर आणि वेळे परिसरात जाम लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.