Satara Protest: ‘आरडीसी’च्या दालनात आंदोलकांचा राडा

रिपब्‍लिकन सेनेच्‍या जिल्‍हाध्‍यक्षांचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न; जोरदार धुमश्‍चक्री
Satara Protest: ‘आरडीसी’च्या दालनात आंदोलकांचा राडा
Published on
Updated on

सातारा : विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तर, महिला आघाडीच्या पूजा बनसोडे यांनी कार्यालयाच्या आवारात अंगावर इंधन ओतून घेतले. निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) नागेश पाटील यांच्या दालनात घुसून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्याने जोरदार धुमश्‍चक्री उडाली.

गेल्‍या आठ दिवसांपासून संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पश्‍चिम महाराष्‍ट्र अध्‍यक्ष रमेश उबाळे यांच्‍या नेतृत्‍वाखाली आंदोलन सुरू आहे. सातार्‍यातील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करत प्रशासनाला यापूर्वी अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र, मुदत संपूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले. रिपब्लिकन सेनेने गुरुवारी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निमाण झाले. प्रशासनाने चर्चेसाठी पुढे न आल्याचा आरोप करत संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र आंदोलन छेडले. अक्षय कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनवणी करूनही कांबळे मागण्यांवर ठाम होते.

पोलिसांनी मनधरणी करून संबंधित विभागांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कांबळे हे प्रवेशद्वारावरून खाली उतरले. दरम्यान, पूजा बनसोडे यांनीही आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून प्रवेशद्वारासमोर अंगावर इंधन ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्या पवित्र्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये खबळबळ माजली. बनसोडे यांनी सरळ निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे दालन गाठले. आंदोलन व अधिकार्‍यांमध्ये राडा झाला. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली. अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे तिथे असलेल्‍यांची पळताभुई थोडी झाली. पूजा बनसोडे यांनी माचीस शोधायला सुरुवात केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या नावाचा जयघोष केला तेव्‍हा आरडीसी नागेश पाटील यांनी ‘बेकायदेशीर काही करू नका,’ असे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यावर आंदोलक खवळल्‍या.

पोलिस अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर अक्षय कांबळे आणि पूजा बनसोडे यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. रिपब्लिकन सेनेच्या मागण्यांवर लवकरच चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. आरडीसी नागेश पाटील यांना आंदोलनाच्‍या मांडवात येऊन रमेश उबाळे, पूजा बनसोडे, अक्षय कांबळे यांच्‍या हातात आश्‍वासनांचे पत्र द्यावे लागले तेव्‍हाच आंदोलन मागे घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news