

वाई : वाई तालुक्यातील कुसगाव या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने सुरू करण्यात आलेला ब्लॅक जेम्स स्टोन क्रेशर बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी मुंबईच्या दिशेने लाँग मार्च काढला आहे. शुक्रवारी तहसिलदार सोनाली मिटकरी यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी तहसिलदारांनी आंदोलनकर्त्यांशी क्रशर बंद करण्याबाबत चर्चा केली. मात्र, लेखी देताना पत्रात त्याचा उल्लेख न करता दिशाभूल केली. याविरोधात ग्रामस्थांनी खंबाटकी बोगद्यातच बोंबाबोंब आंदोलन केले. यामुळे घाटात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबईच्या दिशेने निघालेला लाँग मार्च रोखण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी संबंधित क्रशरचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली. जोपर्यंत दगडखाण व क्रशर परवाना रद्द करण्याचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही लॉन्ग मार्च थांबवणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला. यावर जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेवून तोडगा काढू. तोपर्यंत क्रशरच्या ठिकाणी सुरू असणारी सर्व प्रक्रिया थांबवली जाईल व त्याबाबत लिखित स्वरूपात दिले जाईल, असे तहसिलदार मिटकरी यांनी सांगितले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांसोबतची बैठक होईपर्यंत क्रशरमधील ब्लास्टिंग उत्खनन व कृषी त्याचबरोबर वाहतूक थांबवण्याचे लेखी पत्र द्या आम्ही हे आंदोलन स्थगित करतो, असे सांगितले.
त्यावर तहसिलदारांनी पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली. थोड्या वेळात त्यांचे प्रतिनिधी संबंधित पत्र घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले. मात्र, पत्रात फक्त जिल्हाधिकार्यांसोबत बैठक नियोजित करण्याबाबतचा फक्त उल्लेख होता. क्रशरच्या ठिकाणी असणारी प्रक्रिया थांबवण्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे आंदोलकांचा पारा चढला. त्यामुळे तहसिलदारांविरोधात खांबाटकी बोगद्यात घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसिलदारांच्या निलंबनाचीही मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी महामार्गावरच आंदोलन केल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.