

बामणोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेले जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ ठिकाणी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. कोअर झोनमधील क्षेत्रातच त्यांनी ठाण मांडून संसार थाटला आहे. भिवंडी तालुक्यातील एकसळ सागाव येथे झालेले पुनर्वसन मान्य नसून तेथील आदिवासी आम्हाला सुखाने जगू देणार नाहीत, त्यामुळे ‘आता आम्ही येथेच राहणार व येथेच मरणार’, अशी भूमिका घेत या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी चुली पेटवल्या.
जावळी तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन एकसळ सागाव (ता. भिवंडी, जि. ठाणे) या ठिकाणी 2015 साली पुनर्वसन करण्यात आले. एकूण 120 खातेदारांकरिता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून 242 हेक्टर जागा दिली होती. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणार्या एकूण 70 कुटुंबांचे पुनर्वसन हे त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्यांनी ठरवले. त्यापैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले.
मात्र, नजीकच असणार्या आदिवासी लोकांचा त्रास या लोकांना गेल्या दहा वर्षांपासूनच त्या ठिकाणी होत आहे. त्या त्रासाला कंटाळून व सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा आपल्या मूळगावी परतण्याचे निश्चित केले.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एकसळ सागाव (जि. ठाणे) येथून एकूण 22 जण मिनी ट्रॅव्हल्सने महाबळेश्वरात आले. तिथून कुरोशी पुलावरुन वाघावळे, उचाट, आकल्पे या ठिकाणी साडेनऊ वाजता पोहोचले. त्यानंतर आकल्पेमधून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास रवंदी, आडोशीमार्गे माडोशी येथे प्रकल्पग्रस्त पोहाचले. काही जण दुचाकीवरुन बामणोलीत आले. तिथून खासगी बोटींनी गावी पोहोचले. जवळपास 60 प्रकल्पग्रस्तांनी आपले मूळ गाव गाठले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मूळ गावी जाऊ नयेत म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली होती, त्यानंतर देखील व्याघ्र प्रकल्पग्रस्त हे चालत पायी मार्गाने कोअरक्षेत्रात बोटीने न जाता बफर क्षेत्रात बोटी लावून परत पायी आपल्या मूळ गावी पोहोचले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी प्रकल्पग्रस्तांची चर्चा केली.
तानसा नदीकिनारी हे पुनर्वसन करण्यात आले असून त्या ठिकाणी दिलेली जागा ही दलदलीची असून शेती योग्य नाही तसेच घरे बांधलेली आहेत, ती जागा देखील पावसाळ्यामध्ये खचत आहेत. त्यामुळे घरांना भेगा पडत आहेत. 18 नागरी सुविधांपैकी बहुतांश सुविधा या त्या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत. रेशनकार्ड दिले आहेत मात्र त्यावर ऑनलाईन नसल्या कारणास्तव रेशन मिळत नाही. गुरं घेऊन चारायची म्हटलं तर त्या ठिकाणी चारा उपलब्ध होत नाही. ज्या ठिकाणी जागावाटप केलेली आहे, त्यातील बहुतांश जागेवर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन आजपर्यंत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचा कोणताही प्रश्न निकाली न लागल्याने आम्ही शेवटी आमच्या मूळ गावी परतलो आहोत, अशी भावना प्रकल्पग्रस्तांच्या अधिकार्यांसमोर व्यक्त केल्या.