Satara News: प्रतापसिंह उद्यानासाठी शासनाकडून ५ कोटी; निधीवरून दोन्ही राजेंमध्ये उफाळला श्रेयवाद

साताऱ्यातील ऐतिहासिक श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यानासाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला
Udayanraje Bhosale-Shivendra Raje Bhosale
Udayanraje Bhosale-Shivendra Raje Bhosale
Published on
Updated on

सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यानासाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने ५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीवरून साताऱ्याच्या दोन्ही राजेंमध्ये श्रेयवाद पेटला आहे. दोन्ही राजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. या निधीतून उद्यानात विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असून त्यामुळे उद्यानाचे रूपडे पालटणार असल्याचे दोन्ही राजेंनी स्पष्ट केले.

सातार्‍याच्या ऐतिहासिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, नगर विकास खात्याचे मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान' या योजनेंतर्गत सातारा पालिकेस मिळालेल्या निधीतून श्री. छ. प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यानाचा कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा पालिकेचे नगरसेवक पंकज चव्हाण यांनी श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माझ्याकडे केली होती. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या विषयाचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मंजूर निधीतून उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे. ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांसाठी सुंदर हरित परिसर, वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्यांची सुविधा आणि आवश्यक विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात पंकज चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे की, राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले व श्री.छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या विशेष सहकार्यामुळे ५ कोटींचा निधी मंजूर करून आणता आला. तीन वर्षांपासून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला त्याचे फळ मिळाल्याचे पंकज चव्हाण म्हणाले.

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस, नगर विकास खात्याचे मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. या ऐतिहासिक उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे. उद्यानाचा नियोजनबद्ध आणि सर्वांगिण विकास करण्यात येणार आहे.
- खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

सातार्‍यातील ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान' या योजनेतून तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून उद्यानाचे रूपडे पालटणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे, सातारा शहराचा सर्वांगिण विकास साधणे आणि शहराचा चेहरामोहरा बदलून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच नागरिकांच्या हिताची विविध विकासकामे मार्गी लावण्याबरोबरच शहरातील विविध उद्याने, बाग-बगीचा विकसित करण्यावर आपण भर दिला आहे. त्यानुसारच गांधी मैदान येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यान विकसित करण्यासाठी राज्य सरकारने ५ कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध झाल्याने ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाचे रूपडे पालटणार असून याठिकाणी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करून परिसराचा कायापालट करणार आहे.

दरम्यान, उपलब्ध निधीनुसार प्रतापसिंह महाराज उद्यानाचा विकसित डीपीआर तातडीने तयार करण्याच्या सुचना ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांना दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीने अनुभवी व तज्ज्ञ आर्किटेक्ट नियुक्त करून विकास आराखडा तयार करावा. वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळणी यासह आकर्षक बगीचा विकसित करणे आणि संपूर्ण परिसराचा कायापालट करणे यादृष्टीने आराखडा तयार करून तातडीने पुढील कार्यवाही करावी, अशा सुचनाही ना. शिवेंद्रराजे यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान' या योजनेतून तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानतो. उद्यानाचा विकसित डीपीआर तातडीने तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
- ना. शिवेंद्रराजे भोसले
logo
Pudhari News
pudhari.news