

सातारा/ धुळे : शहराचे नाक असलेल्या पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंटजवळ कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला अडवून मारहाण करत पाच दरोडेखोरांनी तब्बल 22 तोळे सोने लुटले. या सोन्याची किंमत सुमारे 32 लाख 4 हजार 500 रुपये आहे. याप्रकरणी सातारा व धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई करत संशयित पाच दरोडेखोरांना पाठलाग करून जेरबंद केले. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सिमेवर असणाऱ्या शिरपूर परिसरात करण्यात आली.
अभिषेक सुरेंद्र शिकलबार, अंकुश जाट, अनुज रामाधर दिवाकर, पंकज केदार राठोड व अजय फौजदा राठोड (रा. सर्वजण मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. दरोड्याप्रकरणी नितीन खेमचंद जैन (वय 50, रा. अमृत प्लाझा कॉलनी, सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार जैन हे रविवार पेठ, सातारा येथील श्रद्धा ज्वेलर्समध्ये गेल्या 25 वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईतील झवेरी बाजार येथे असलेल्या रितेश कावेडिया ज्वेलर्सकडे वितळवलेले सोन्याचे बार पाठवण्याचे तसेच तयार दागिने मागवण्याचे काम ते नियमितपणे करतात.
दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.15 वाजता जैन यांनी न्यू लक्ष्मी एअर पार्सल कुरिअर, सातारा येथील कर्मचारी कोमलसिंग परिहार यांना मुंबईसाठी कुरिअर पाठवायचे असल्याची माहिती दिली. त्यानुसार कोमलसिंग परिहार हा जैन यांच्यासह अन्य दोन सराफी दुकानातून सुमारे 215 ग्रॅम सोन्याचा ऐवज घेवून कुरिअर कंपनीकडे दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी पाच संशयित दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले. त्यांनी कोमलसिंग परिहार (वय 36, रा. सातारा) यांना अडवून मारहाण केली आणि त्यांच्या ताब्यातील सोन्याचा मुद्देमाल जबरीने पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील सेल्फी पॉईंट येथे घडली आहे.
परिहार यांच्याकडे श्रद्धा ज्वेलर्समधील जैन यांचा 50 ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार (अंदाजे किंमत 7 लाख 87 हजार 500 रुपये) असलेले पार्सल होते. त्याचबरोबर संतोषी ऑर्नामेंट्स, 501 पाटी, येथील शशिकांत जाधव यांचे 85 ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या गोळ्या (अंदाजे किंमत 11 लाख 53 हजार रुपये) तसेच त्रिमूर्ती गोल्ड शॉपचे मालक उत्तम साळुंखे यांचा 80 ग्रॅम वजनाचा सोन्याचा बार (अंदाजे किंमत 12 लाख 64 हजार रुपये) असा ऐवज होता. दरोडेखोरांनी 215 ग्रॅम वजनाचे 32 लाख 4 हजार 500 रुपयांचे हे सोने लुटून पोबारा केला होता.
घटनेची फिर्याद दाखल होताच सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने तातडीने तपासाची चक्रे गतिमान केली. संशयितांची माहित मिळवत पोलिसांनी त्यादिशेने पथक पाठवले. जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी यांनी धुळे येथील जिल्हा पोलिस प्रमुखांशी संपर्क साधून घटनेची व संशयितांची माहिती दिली. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी धडक कारवाई करत महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या शिरपूर परिसरात पाच संशयितांना जेरबंद केले. दरम्यान, शहरात घडलेल्या या दरोड्यामुळे नागरिक व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरोडेखोरांना असे केले जेरबंद...
कुरिअर कंपनीचा कर्मचारी कोमल परिहार हा सराफांकडील 22 तोळे सोने घेवून दुचाकीवरून निघाला होता. त्याला साताऱ्यातील पोवई नाक्यावरील सेल्फी पॉईंटजवळ कारमधून आलेल्या पाच दरोडेखोरांनी अडवले. त्याला मारहाण करत 22 तोळे सोने लुटून संशयित कारने पसार झाले होते. याबाबत सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी धुळ्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळवले. यात पांढऱ्या रंगाच्या कारची एका बाजूची काच फुटल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे व चोरटे मध्य प्रदेशात जाण्याची शक्यता व्यक्त झाल्याने धुळ्याचे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी तातडीने चक्रे फिरवत मुंबई-आग्रा महामार्गापासून मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत ठिकठिकाणी सापळे लावून तपासणी केली.
शिरपूर तालुक्यात पोलिसांनी एका संशयित गाडीला थांबवण्याचा इशारा केला. मात्र चालकाने टोल नाका चुकवून शिरपूर गावातील रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिस पथकाने पाठलाग करून कारला घेरले. संशयित पाच जणांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. त्यावेळी कारमधील संशयित अभिषेक सुरेंद्र शिकलबार, अंकुश जाट, अनुज रामाधर दिवाकर, पंकज केदार राठोड व अजय फौजदा राठोड (रा. सर्वजण मध्य प्रदेश) यांनी साताऱ्यातील दरोड्याची कबुली दिली.