

सातारा : संपूर्ण सातारकर रस्त्यावरील खड्ड्याने बेजार झाले असताना बुधवारी मात्र पोवईनाक्यावरील आयडीबीआय बँकेच्या बाजूला रस्त्याला डांबराचं ठिगाळ लावले गेले. हे करत असताना शिवतीर्थालगत असलेले खड्डे मात्र तसेच ठेवल्याने या तुघलकी कारभाराची खुमासदार चर्चा चांगलीच रंगली. उपमुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर असल्याने छानछोकी दिसावं यासाठी प्रशासनाला कुतवून ठिगाळाचा प्रपंच झाला. यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी येत्या काळातही सातारा शहराचा चौकाचौकाचा दौरा काढावा, अशी उपहासात्मक मागणी होवू लागली आहे.
बुधवारी दिवसभर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे सातारा शहरात होते. सैनिक स्कूल, जिल्हा परिषदेचा हॉल व पोवई नाका परिसरात अनेक ठिकाणी भेटीगाठी होत्या. साताऱ्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सातारकर त्रस्त असताना पोवई नाक्यावर दोन दिवसांपूर्वी डांबर टाकण्याची मोहीम सुरु होती. यामुळे संपूर्ण साताऱ्यात डांबरीकरण होणार अशी आशा सातारकरांना लागली. मात्र सातारकरांच्या नशिबी पुन्हा दुर्देव आले. दोन दिवसांपूर्वी पोवई नाक्यावरील डांबर टाकल्यानंतर डांबर टाकणारे गायब झाले. दिवसभरात केवळ एकाच ठिकाणी डांबर पडले. दुसऱ्या दिवशी पुन्हा डांबर टाकण्याचे व रस्ते दुरुस्तीचे काम सुरु होईल असे वाटले.
शिवतीर्थालगत बरेच मोठे खड्डे असल्याने आणि खड्ड्यांमध्ये वाहने आदळत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी हेही खड्डे बुजवले जातील अशी सातारकरांना आशा होती. मात्र एकाच ठिकाणचे काम झाल्यानंतर प्रशासन चिडीचूप झाले. यावरुन बुधवारी दिवसभर साताऱ्यात चर्चा सुरु होती.