

महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावरून सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. हा वाद आता थेट उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात पोहोचला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष त्याकडे लागले आहे.
नगरपरिषदेला केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेतून सुमारे 64.85 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी सुमारे 30.73 कोटी रुपये नूतन प्रशासकीय इमारतीसाठी मंजूर झाले आहेत. जानेवारीमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कंत्राटदाराला कार्यादेशही देण्यात आला आहे.दरम्यान, विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांनी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांनी सध्याच्या जागेत चटई क्षेत्र शिल्लक नसताना नवीन इमारत उभारण्यासाठी शाळा, महाविद्यालय व समाजमंदिरासह सुमारे 13 इमारती पाडाव्या लागणार आहेत. नवीन इमारतीला आमचा विरोध नाही. मात्र, हेरिटेज इमारती पाडल्या जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था केली नाही. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याला प्रत्युत्तर देताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळत जुनी प्रशासकीय इमारत जीर्ण झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन इमारत आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनेच सुरू आहे. विरोधकांकडून चुकीची माहिती देऊन जनतेत भीती निर्माण केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही शाळा किंवा इमारती पाडण्याचा निर्णय झालेला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्राथमिक नोटीस किंवा सुनावणीला नूतन प्रशासकीय इमारतीला स्थगिती म्हणून रंगवणे हा खोटा प्रचार कुमार शिंदे करत आहेत न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
महाबळेश्वर पालिकेच्या या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावरून सत्ताधारी व विरोधी गटात आता वादाला फोडणी मिळाली आहे. ऐन गर्मीत वातावरण तापले आहे. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले सुरु असताना आता शहरात नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या जाहीर निषेधाचे फलक लावण्यात आले होते. हे फलक लावण्याने वातावरण अधिकच पेटले. अखेर नगराध्यक्ष व सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत हे तातडीने हटवण्याची सूचना दिल्या. हे फलक पालिकेने जप्त केले त्यानंतर हे फलक हटवल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांवर विरोधी गटाकडून देखील सोशल मीडियावर सडकून टीका केली गेली. कुमार शिंदे यांनी थेट शाळेची इमारत पडणार असल्याचा धक्कादायक दावा करत माहिती अधिकारातील सर्वच माहिती महाबळेश्वर शहरातील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
यामुळे शाळेचे माजी विद्यार्थ्यांमध्ये देखील आता सोशल मीडियावर याच विषयावर चर्चा रंगत आहेत. नूतन प्रशासकीय इमारतीच्या या वादामुळे महाबळेश्वरचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले असून आता दि. 16 एप्रिलच्या न्यायालयीन सुनावणीवर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.