

सातारा : सातारा लोकसभेची अटीतटीची लढत ज्यांच्यात झाली ते भाजपचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यातील यारी दोस्ती पुन्हा गुरुवारी सातारा तहसील कार्यालयाच्या आवारात जुळलेली दिसली. दंगा मस्तीच्या मूडमध्ये असलेल्या दोन्ही नेत्यांची ‘फिर वही दिल लाये है।’ अशीच देहबोली होती. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेही या हास्यकल्लोळात सामील झाले.
सातारा - सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. साताऱ्यातील तहसिलदार कार्यालयातील मतदान केंद्र परिसरात भर दुपारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा.श्री.छ. उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यात जुगलबंदी रंगली. नामदार, खासदार व माजी आमदार असलेल्या या भाजपा व राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी गळाभेट घेतली. तर खा. उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे कानात गुप्तगू करत संदेश दिला. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील, सुनील काटकर, काका धुमाळ यांच्या साक्षीने तहसील कार्यालयाच्या आवारातच ही मैफल जमली.
सातारा - सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाचे धैर्यशील कदम व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप यांच्यात थेट सामना झाला. सातारा तालुका हा हॉटस्पॉट असल्याने उमेदवारांसह लोकप्रतिनिधीच्या नजरा साताऱ्याकडे लागून राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच सातारा तहसील कार्यालय परिसरात राजकीय पदाधिकाऱ्यांची वर्दळ दिसून आली. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती हे या निवडणुकीसाठी मतदार आहे. आपल्या हक्काचे मतदान फूटू नये यासाठी सर्वच वरिष्ठ नेत्यांनी काळजी घेतली.
साताऱ्यात सर्वाधिक मतदान असल्याने साताऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळेच ना. शिवेंद्रराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले व माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी तहसीलदार कार्यालयात तळ ठोकला होता. प्रवेशद्वारावरच या तिन्ही नेत्यांची गाठभेट झाली. सोबत नरेंद्र पाटीलही होते. विरोधी पक्षांचे असले तरी तिन्ही नेत्यांनी हसतखेळत एकमेकांचे स्वागत केले. हस्तांदोलन करत विविध विषयांवर चर्चाही झाली. यावेळी मैत्री ही मैत्री असते असे म्हणत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेची गळाभेट घेतली. यानंतर दोघांमध्ये गुप्तगूही झाली या भेटीने उपस्थित आवाक् झाले. त्यानंतर उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह निघून गेले मात्र ना.शिंवेंद्रराजे भोसले व शशिकांत शिंदे हे आपल्या पक्षाच्या मतदाराकडून मतदानाचा आढावा घेत होते. तिन्ही नेत्यांच्या या भेटीची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच चर्चा रंगली होती.