

सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सत्तास्थापन प्रक्रियेतील पुढचा आणि तितकाचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रतोद, गटनेता, उपनगराध्यक्ष, 5 स्वीकृत नगरसेवक तसेच विविध 6 विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी असून ही पदे ‘की-पोझिशन’ ठरवणार आहेत.
नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर प्रशासन आणि राजकारण यांचा खरा समन्वय या पदाधिकारी निवडीतून ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या नगरसेवकाकडे कोणती जबाबदारी सोपवली जाते? हा प्रश्न पक्षीय गणितापुरता मर्यादित न राहता साताऱ्याच्या भविष्यातील कारभाराशी जोडला गेला आहे. त्यामुळे ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी या बाबींकडे लक्ष देण्याची गरज असून साताऱ्याच्या समतोल विकासाला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
सातारा पालिकेत नगराध्यक्षांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर नगरसेवकांना पदाधिकारी निवडीचे वेध लागले आहेत. बरेच नगरसेवक पद मिळावे यासाठी लॉबिंग करत आहेत. नगरपालिकेतील पदाधिकारी हे केवळ सन्मानाचे पद नसून ते शहराच्या विकास प्रक्रियेतील निर्णायक केंद्रे आहेत. त्यामुळे या पदांवर अनुभव, संयम, समन्वयाची क्षमता, प्रशासनाची जाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांप्रती उत्तरदायित्व असलेली व्यक्ती निवडली जावी, अशी मागणी होत आहे.
सातारा पालिकेतील पदाधिकारी निवडताना अनुभव आणि नव्या विचारांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर या पदांवर काम करणारा पदाधिकारी कार्यक्षम असणेही तितकेच गरजेचे आहे. केवळ राजकीय पुनर्वसन म्हणून न पाहता शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनाचा विचार आवश्यक आहे. दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम केलेल्या नगरसेवकांना प्रशासनाची जाण असते, तर तरुण नगरसेवकांकडे ऊर्जा आणि विकासाचे नवे दृष्टिकोन असतात. या दोहोंचा योग्य संगम साधणे हे नेतृत्वाचे खरे कसब ठरणार आहे. तसेच, पक्षांतर्गत गटबाजी, दबाव गटांचे राजकारण किंवा केवळ संख्याबळाच्या आधारे पदे वाटून दिल्यास त्याचा थेट परिणाम साताऱ्याच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे कोण किती ‘बलवान’ यापेक्षा कोण किती ‘सक्षम’ हा निकष लावण्याची गरज पदाधिकारी निवडीमुळे निर्माण झाली आहे.
सातारा पालिकेच्या सभागृहात प्रतोदाचे स्थान अनन्यसााधरण आहे. प्रतोद हे पक्षाच्या नगरसेवकांचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे पद आहे. सभागृहातील पक्षाची भूमिका स्पष्ट करणे, नगरसेवकांमध्ये शिस्त राखणे आणि धोरणात्मक निर्णयांवर एकसूत्रता ठेवणे ही प्रतोदाची प्रमुख जबाबदारी असते. प्रतोदाच्या आदेशाचे पालन करावे लागणार असले तरी प्रतोद हा समन्वय साधणारा, मतभेद मिटवणारा आणि प्रसंगी नगरसेवकांची बाजू प्रशासनासमोर भक्कमपणे, ठामपणे मांडणारा असावा लागतो. प्रतोदाकडे सभागृहातील नियम व नगरपालिका अधिनियम यांची सखोल माहिती, वक्तृत्व कौशल्य आणि संयम असणे आवश्यक आहे. याचा विचार करूनच नेत्यांना प्रतोद पदी योग्य नगरसेवकाची निवड करावी लागणार आहे.
गटनेता हा पद, पक्ष आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. गटनेत्यांची भूमिका केवळ राजकीय असून चालत नाही, ती व्यवस्थापकीय ही असावी लागते. नगराध्यक्ष, प्रतोद, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यात समन्वय राखणे, विकासकामांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणे आणि अडचणींंचे निराकरण करणे हे गटनेत्याचे काम असते. सातारा शहराच्या हिताच्या प्रश्नांवर पक्षाच्या चौकटीत राहून लवचिक भूमिका घेण्याची क्षमता गटनेत्याकडे असणे गरजेचे आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या सभागृहात गटनेता म्हणून योग्य भूमिका घेईल, अशा नगरसेवकाची निवड करावी, अशी मागणी होत आहे.
सातारा पालिकेत विविध विषय समित्या आहेत. त्यामध्ये बांधकाम समिती, आरोग्य व स्वच्छता समिती, पाणीपुरवठा समिती, शहर नियोजन समिती, महिला व बालकल्याण समिती, विशेष मागासवर्गीय कल्याण समिती या सहा समित्यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे तर उपनगराध्यक्ष हे शिक्षण समितीचे पदसिद्ध सभापती असतात. या विषय समित्या विकासाची केंद्रे असतात. या समित्यांचे सभापती म्हणजे त्या विभागांचे धोरणकर्ते असतात. सभापतींना संबंधित विषयांची जाण, निधी नियोजनाची समज आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. केवळ राजकीय वजनामुळे नव्हे तर काम करण्याची तयारी आणि दूरदृष्टी पाहून सभापती निवडले गेले तरच समित्यांचे कामकाज परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे सभापतीपदी योग्य पदाधिकाऱ्याची निवड करण्याची मागणी होत आहे.