

मेढा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावांवरून राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले व माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यात पुन्हा घमासान होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार दोन्ही बाजूंकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून कोण बाजी मारणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
जावली तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व शशिकांत शिंदे यांच्यातील संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सोसायट्यांचे ठराव गोळा करण्यासाठी अंतर्गत डावपेच आखले जावू लागले आहेत. सद्यस्थितीत शिवेंद्रराजेंची बाजू वरचढ दिसत असली तरी शशिकांत शिंदे कोणत्या खेळ्या करणार? याचे अडाखे बांधले जात आहेत.
ना. शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत सातारा तालुक्यातील एका खासगी रिसॉर्टवर विकास सोसायट्यांच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. या बैठकीत प्रत्येक विकास सोसायटीचा ठराव कोणाच्या बाजूने करायचा, त्यासाठी कोणती रणनीती राबवायची आणि शेवटच्या टप्प्यात कोणती भूमिका घ्यायची, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जावळी तालुक्यातील ४९ विकास सेवा सोसायट्यांपैकी तब्बल ४४ सोसायट्यांचे चेअरमन, उपाध्यक्ष व संचालक या बैठकीस उपस्थित असल्याचा दावा राजे गटाकडून केला जात आहे. ठरावांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच संभाव्य ‘पळवापळवी’च्या राजकारणाला आळा बसावा, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरील राजकीय आव्हान अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या बैठकीनंतर शिंदे कोणती रणनीती आखतात, उमेदवारीबाबत कोणती भूमिका घेतात आणि विकास सोसायट्यांमधील समीकरणे कशी जुळवून आणतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार जावळी मतदारसंघातून विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांनाच मंत्री शिवेंद्रराजे भोसले पुन्हा संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबतच्या बैठकीस माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सभापती सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, संदीप परामणे, सागर धनावडे उपस्थित होते.