Satara Politics : रामराजे-शेखर गोरे यांच्यात खलबते

मध्यरात्री तासभर चर्चा; शिवसेनेची स्वतंत्र खेळी; राजकीय चर्चांना उधाण
Satara Politics : रामराजे-शेखर गोरे यांच्यात खलबते
Published on: 
Updated on: 

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू असतानाच शिवसेनेनेही स्वतंत्र राजकीय हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटात नुकतेच प्रवेश केलेले शेखर गोरे यांनी सोमवारी मध्यरात्री साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. काही मतदारसंघांमध्ये घटक पक्षांकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असल्याने जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेखर गोरे आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांची मध्यरात्री झालेली भेट राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, कोणत्या मतदारसंघाबाबत चर्चा झाली किंवा भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत काही निर्णय झाला का, याचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

मात्र, महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चांना वेग आलेला असतानाच शिवसेनेच्या एका प्रमुख नेत्याने राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची घेतलेली भेट विविध चर्चांना कारणीभूत ठरली आहे. या भेटीमागे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदारसंघांचे राजकारण आहे की अन्य राजकीय समीकरणे, याबाबत आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय हालचालींना नवे वळण

महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असताना प्रत्येक पक्षाकडून आपापल्या राजकीय ताकदीचा विचार करून भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे शेखर गोरे-रामराजे भेट ही केवळ सदिच्छा भेट होती की जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील संभाव्य राजकीय समीकरणांबाबतची चर्चा, याचे उत्तर आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, या भेटीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना आणखी एक नवे वळण मिळाले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news