Satara Politics: रखरखत्या उन्हातही माणदेशात राजकीय धुरळा

सगळीकडे रखरखते ऊन असले तरी वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून माणदेशातील नेतृत्वाचा जिल्हाभर राजकीय धुरळा उडत आहे.
Satara Politics
Satara PoliticsPudhari
Published on
Updated on
धनंजय क्षीरसागर

वडूज : खटाव-माण या दुष्काळी तालुक्यात तापमानाचा पारा 35 ते 40 अंशापर्यंत गेला आहे. सगळीकडे रखरखते ऊन असले तरी वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून माणदेशातील नेतृत्वाचा जिल्हाभर राजकीय धुरळा उडत आहे.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत पुरेसे बहुमत नसतानासुद्धा भाजपाची सत्ता आणून माण-खटावचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या नेतृत्वाची किमया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण राज्याला दाखवून दिली होती. त्यावेळी व तद्नंतर मंत्रीमंडळातील सहकारी मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई व ना. जयकुमार गोरे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. मागील काही दिवसांपूर्वी ना. गोरे यांना शह देण्यासाठी आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार देण्याच्या उद्देशाने भाजपा नेते तथा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पाचारण केले होते.

मात्र पहिल्यांदा खराब हवामानामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी माणदेशातील ‌‘बोराटवाडी‌’कडून हवा फिरल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. पहिला कार्यक्रम रद्द झाला तरी कोणाची फिकीर न करता चार ते पाच दिवसांनी गडकरी यांनी मकरंदआबांना दुसरा कार्यक्रम दिला. नेमका याच दिवशी ना. जयाभाऊंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाखो घरांचा लोकार्पण सोहळा आयोजीत केला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना पाचारण करुन कोणी कसेही आडवे आले तरी जिल्ह्यात आपणच आता बाजीगर आहोत हे दाखवून दिले.

याच कार्यक्रमात जि. प. अध्यक्ष निवडीत झालेला रक्तबंबाळ राडा विसरुन पालकमंत्री देसाई व ना. गोरे यांनी एकमेकांना मिठ्या मारत आमचे काही वैयक्तिक भांडण नाही असे जाहीर केले. या गळाभेटीमुळे पोलादी पुुरुष म्हणून ओळख असणाऱ्या बाळासाहेब देसाईंचे वारसदार शंभूराजेंकडून गोरे विरोधकांचा चांगलाच अपेक्षाभंग झाला. तर वाई नगरपालिकेच्या सत्तेच्या जोरावर कुंभेमेळ्याच्या निमित्ताने साधू-संतांसमवेत वावर करुन जयाभाऊंनी दक्षिण काशितही मकरंदआबांच्या मतदारसंघात ‌‘भाऊगिरी‌’ गाजवली. दुसऱ्या बाजूला माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकस्मिक निधनानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व त्यांचे समर्थक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. दादांच्या जाण्यानंतर काही दिवसातच औंध भागाच्या पाणीप्रश्नाचे निमित्त करुन गायत्रीदेवी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. त्यानंतर भाजपा पक्ष प्रवेशासंदर्भात औंध गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

यासंदर्भात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी सल्ला मसलत करुन त्या निर्णय घेणार होत्या. मात्र त्या दोघांमध्ये ‌‘राजेशाही भेट‌’ झाली का नाही याचा अद्याप खुलासा जनतेसमोर आला नाही. तसेच मंत्री जयाभाऊ गोरे यांना कॉर्नर करुन गायत्रीदेवींचा पक्षप्रवेश होवू शकतो का? याबाबत उलट-सुलट चर्चा आहे.

एका बाजूला ना. जयकुमार गोरे व भाजपाचा वारु चौफेर उधळत असताना त्यांच्या विरोधात भविष्यात कोण लढाई करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात लढलेले माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, रणजितसिंह देशमुख हे सावध पवित्र्यासह डिफेन्स मोडमध्ये आहेत. ना. गोरे यांच्या विरोधात भविष्यात संघर्ष कोण करणार असा यक्ष प्रश्न आहे. अशा परस्थितीत अभयसिंह जगताप यांच्यासारखा सक्षम युवा पर्याय पुढे येवू पाहात आहे. कातरखटाव जिल्हा परिषद गटात फंदफितुरीचे राजकारण व स्वकीयांच्या कुरघोडीमुळे त्यांचा निसटता पराभव झाला. तरीही न डगमगता त्यांनी आपली वाटचाल चालू ठेवली आहे.

मागील काही दिवसात त्यांनी वडूज या तालुक्याच्या गावात ‌‘स्टोरी राज्यभिषेकाची‌’ या ऐतिहासिक नाटकाचा जाहीर प्रयोग आयोजित केला. या नाट्याच्या माध्यमातून ब्राम्हण्यवादावर टिकेची झोड उठवत पुरोगामी विचारांची मोट बांधण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे जाणवले. या कार्यक्रमास शहरासह तालुक्यातील मान्यवर भाजपा विरोध पदाधिकाऱ्यांची आवर्जुन हजेरी होती. या निमित्ताने आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपा विरोधी सर्वपक्षीय आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या शिडात तात्पुर्ती का होईना हवा भरल्याची चर्चा होती.

तर दोन दिवसांपूर्वी स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभयसिंह यांनी आपल्या जन्मगावी वरकुटे-मलवडी येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वीपणे भरवली. या स्पर्धेला खटाव-माणसह सातारा, सांगली जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून जगताप यांच्या भविष्यकालीन वाटचालीस प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठबळ दिले आहे. अशाप्रकारे खेळ, कला, संस्कृती, उद्योजगताच्या माध्यमातून वाटचाल करतच ना. गोरे यांच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी दाखवली तर आगामी काळात अभयसिंह यांच्या रुपाने विरोधकांना एक सक्षम पर्याय मिळू शकतो. असे असले तरी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप तीन वर्षांचा कालावधी आहे. तोपर्यंत येरळामाई व माणगंगेच्या पात्रातून बरेच पाणी वाहून जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news