

सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी धूमशान सुरू झाले आहे. छाननीमध्ये जिल्ह्यातील 81 जण आऊट झाले. रविवार, सोमवार सुट्टी असल्यामुळे आता माघारीसाठी अवघा एक दिवस उरला आहे. त्यामुळे बंडखोरी थोपवण्यासाठी आणि मतदारसंघामधील अपक्ष उमेदवारांच्या माघारीसाठी नेत्यांना कसरत करावी लागत आहे.
मंगळवारी माघार घेण्याच्या दिवशीच संबंधित उमेदवार गायब झाला, तर करायचे काय, या विवंचनेमुळे अनेकांना उमेदवार सांभाळण्याची वेळ आली आहे. या कालावधीत लाडीगोडी, मनधरणी, प्रसंगी धाकदपटशाही करावी लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या 65 गणांसाठी 632, तर पंचायत समितीच्या 130 गणांसाठी 1 हजार 59 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी एकूण 81 उमेदवार छाननीत बाद ठरले आहेत. अजूनही मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात आहेत. दि. 27 जानेवारी ही माघारीसाठी अंतिम मुदत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या चार तासांच्या कालावधीतच उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. बंडोबांना थंड करण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी नेत्यांचा घामटा काढला आहे.
दरम्यान, उमेदवारांपुढे या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांचे पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे प्रमुख दोन पक्षांनी नाकारले तरी इतर सत्तेतील पक्षासोबत जाण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. अनेक ठिकाणी भाजप, राष्ट्रवादीच्या नाराज उमेदवारांनी शिवसेनेचा एबी फॉर्म मिळवला आहे. याउलट पक्षावर नाराज होत काहींनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अपक्षांचे प्रत्येक मतदारसंघात गट असल्याने याचा फटका पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बसणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन नेत्यांकडून माघारीसाठी चाचपणीही सुरू झाली आहे.
निवडणुकीत अजूनही मोठ्या संख्येने उमेदवार आहेत. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी बंडखोरीमुळे कितीजण माघार घेतात हे पाहण्याजोगे आहे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये पक्षातून बंड केलेल्या उमेदवारांनी शड्डू ठोकलेले आहेत. त्यामुळे त्यांना शांत करणे, त्यांची मर्जी सांभाळणे आणि विशेष म्हणजे चार दिवस माघार घेण्यासाठी तुणतुणे वाजवणे असले प्रकार करावे लागणार आहेत. गटात किंवा गणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सेफ ठेवण्यासाठी अपक्षांची मनधरणी करण्यात येत आहे. मतपरिवर्तन होऊन अपक्ष गायब झाला तर करायचे काय? यामुळेही नेतेमंडळींचे डोके आऊट होऊन गेले आहे. यासाठी उमेदवारांकडून विविध क्लुप्त्या शोधल्या जात आहेत. त्यामध्ये पैसा, पदे यासह अन्य नावीन्यपूर्ण गोष्टींचा विचार होऊ लागला आहे.
दोन दिवसांत 70 जणांची माघार
सातारा जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी 58 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे दोन दिवसांत 70 जणांनी निवडणुकीतून पळ काढला आहे. मंगळवार, दि. 27 जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्याच दिवशी निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 65 गटात वाई 1, फलटण 1, माण 1, खटाव 1, कोरेगाव 1, सातारा 1, पाटण 11, कराड 4 असे मिळून 21 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. पंचायत समितीच्या 130 गणांसाठी 941 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांच्या छाननीत 30 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे निवडणूक रिंगणात 911 उमेदवार राहिले आहेत. शनिवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी पंचायत समितीच्या महाबळेश्वर गणातून 1, फलटण 3, माण 3, खटाव 2, कोरेगाव 6, सातारा 4, जावली 1, पाटण 22, कराड 7 असे मिळून 49 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.