

अविनाश कदम
खटाव : आरक्षण सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने तालुक्यात सर्वाधिक प्रतिष्ठेच्या बनलेल्या खटाव जिल्हा परिषद गटात हेवीवेट इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खटावमध्ये चौरंगी हाय व्होल्टेज मुकाबल्याची डिमांड होवू लागली आहे. अनेक अर्थाने महत्वाच्या आणि संवेदनशील खटाव गटावर कमांड ठेवण्यासाठी अस्सल राजकीय घराण्यांनी कंबर कसली आहे.
आ. महेश शिंदेंच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी आमदार चंद्रहार पाटील यांचे नातू राहुल पाटील तसेच घराण्याचा राजकीय वारसा असणाऱ्या आणि पुसेगाव परिसराच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेल्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी आरपारच्या लढाईत उतरण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.
अगोदर पुसेगाव आणि हरकती मान्य झाल्यावर पुन्हा खटाव नामकरण झालेल्या जिल्हा परिषद गटात गेल्या अडीच वर्षांपासून अनेकांनी मोर्चेबांधणी केली आहे. सर्व इच्छुकांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे होत्या. खटाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याचे समजताच पुसेगाव आणि खटावमध्ये फटाके फोडण्यात आले होते. फटाके फोडण्यात राहुल पाटील गट आघाडीवर होता. सुरुवातीला एकला चलो रे आणि नंतर आ. महेश शिंदे यांच्या बरोबर राहून राहुल पाटील यांनी खटावच्या राजकारणात बऱ्यापैकी जम बसवला आहे. सासरे प्रभाकर घार्गे यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची धुरा त्यांनीच वाहिली होती.
गेली अनेक वर्षे एकत्र असलेले आ. महेश शिंदे आणि पाटील यांचे गट गेल्या काही दिवसांपासून अंतर ठेवून वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. त्याला कारणे अनेक असली तरी तरुण वय असल्याने स्वतंत्र आणि स्वतःच्या हिमतीवर राजकीय वहिवाट तयार करण्याचा महत्वाकांक्षी फॅक्टर उचल खाताना दिसत आहे. माजी आमदार प्रभाकर घार्गेंची सर्वसमावेशक साथ, पत्नी प्रिती घार्गे पाटील यांचे अनुभवी राजकारणाचे पाठबळ राहुल पाटील यांना चार हत्तींचे बळ देत आहे.
आ. महेश शिंदे यांच्या गोटातून अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी बांधून रान उठवले आहे. तिकडे पुसेगावातून सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव तयारीत आहेत. यदाकदाचित एकत्र राहिले तर राहुल पाटील आघाडीवर आहेतच. असे त्रांगडे होवून नाराजी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आ. महेश शिंदे सरतेशेवटी डॉ. प्रिया शिंदेंची सर्वसमावेशक उमेदवारी काढतील असा अंदाज आहे. डॉ. प्रिया शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली तर सगळे विरोधक चार वेळा विचार करतील. प्रियाताई निवडणूक असो वा नसो तळागाळात संपर्क ठेवण्यात वाकबगार आहेत.
खटाव तसेच तालुक्याच्या आणि आता जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारे जि. प. चे माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधातेंसाठी ही निवडणूक स्थानिक तसेच वरच्या राजकारणासाठी महत्वाची आहे. प्रदीप आण्णांना ही निवडणूक लढावीच लागणार आहे. आरक्षणात हा गट खुला झाल्याने त्यांना पहिला सेटबॅक बसला आहे , मात्र खुल्या गटात आणि गणात लढण्याचा त्यांना पाठिमागील अनुभव आहे. त्यामुळे ना. अजितदादांच्या राष्ट्रवादीतून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
गटातील दुसरे किंबहुना खटाव इतकेच मोठे गाव पुसेगाव आहे. आपल्या गावातीलच जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे अशी पुसेगावकरांची अपेक्षा आहे. विश्वस्त गौरव जाधव यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या गोटातून चांगलीच तयारी केली आहे. त्यांना स्थानिक स्तरावरील तसेच बहुचर्चित श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीचा चांगला अनुभव आहे. त्यांना समृद्ध राजकारणाचा कौटुंबिक वारसाही आहे. त्यामुळे ते नक्कीच रिंगणात उतरणार आहेत.
खटाव गणही खुला झाल्याने आ. महेश शिंदे, प्रदीप विधाते, राहुल पाटील यांचे समर्थक चांगलेच ॲक्टिव्ह झाले आहेत. आ. महेश शिंदेंच्या गोटातून उद्योजक सुरज देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मोहन घाडगे आणि अनेकजण इच्छुक असले तरी गणाची उमेदवारी खटावमधून निघणार की समतोल साधण्यासाठी इतर गावात जाणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रदीप विधाते यांच्या गोटातून ना. अजितदादा राष्ट्रवादीतील अनेक जणांनी खटाव गणासाठी देव पाण्यात घातले आहेत. तीच परिस्थिती राहुल पाटील गटाची असल्याने खटाव गणही चांगलाच चर्चेत आला आहे. पुसेगाव गण ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सर्वच गटांना भौगोलिक समतोल साधत सक्षम उमेदवार शोधावे लागणार आहेत.