

सातारा : जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतर्फे जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. राष्ट्रवादीने गुरुवारी रात्री ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या नूतन सदस्यांची बैठक झाली.
या बैठकीमध्ये गट नोंदणीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आल्या. तसेच, शिवसेनेतर्फे शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक घेऊन त्यांना पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ना. देसाई यांना शिवसेनेच्या व्हीपचे अधिकार देण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या 65 जागांपैकी भाजपला 27, राष्ट्रवादी व स्वाभिमानीला 21, शिवसेनेला 15, काँग्रेसला 1 तर अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी एका पक्षाला सोबत घेतल्याशिवाय भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही, त्यामुळे दोन्ही पक्ष किंगमेंकरच्या भूमिकेत आहेत. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे राजकारण पुढे कोणते वळण घेणार? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
राज्यात सत्तेवर असल्याने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या वावड्याही उठत आहेत. अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर येत नसल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरील राजकारणाचा विचार केल्यास राष्ट्रवादी व शिवसेनेचे स्थानिक नेते एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी आग्रही असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, वरून काय निरोप येतो, त्यावर पुढील रणनीती अवलंबून असल्याने संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे.
दरम्यान, शिवसेनेने बैठक घेवून सविस्तर अहवाल मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनीही कार्यकर्त्यांच्या मनात असणाऱ्या बाबी वरिष्ठांना कळवून मोकळे झाले आहेत. कार्यकर्त्यांचा रेटा लक्षात घेवून वरिष्ठ पातळीवरुन जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा निर्णय होतो की तिन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय होतो, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजपची आज बैठक
जिल्ह्यातील नव्याने निवडून आलेल्या भाजपच्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ शनिवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता साताऱ्यात आयोजित केला आहे. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, खा. उदयनराजे भोसले, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.