Satara Politics: आधी भाजपला बांधून घ्या; राष्ट्रवादी सदस्यांच्या भावना तीव्र

निर्णयाचे अधिकार मकरंदआबांना
Makarand Patil
Makarand PatilFile Photo
Published on
Updated on

सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, याबाबतचे सर्वाधिकार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवले आहेत. साताऱ्यात रविवारी झालेल्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बैठकीत उपस्थित मतदार आणि पदाधिकाऱ्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला स्पष्ट अटींवर बांधून घेण्याची मागणी केली.

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीवेळी भाजपने केलेला व्यवहार निंदनीय आहे. निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतरही भविष्यात पुन्हा अन्याय होण्याची भीती कार्यकर्त्यांनी मांडली. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना भाजपकडून स्पष्ट राजकीय हमी घेण्याची मागणी बैठकीत झाली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीस मंत्री मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्‍हा बँक संचालक दत्तानाना ढमाळ, जि.प. पक्षप्रतोद उदय कबुले, प्रतापराव पवार, ॲड. उदयसिंह उंडाळकर- पाटील, कांतीलाल पवार, प्रमोद शिंदे, श्रीनिवास शिंदे, अनिल देसाई, सुनील माने, संदीप मांडवे, माणचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.

बैठकीत मकरंद पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना खुलेपणाने मते मांडण्याचे आवाहन केले. त्यानुसार अनेकांनी भूमिका स्पष्ट केली. भाजपचे नेते निवडणुकीपुरते गोड बोलतात; मात्र नंतर शब्द पाळत नाहीत. मतदारसंघात निधी देताना दुजाभाव केला जातो. अनेक ठिकाणची विकासकामे जाणून बुजून अडवली जात आहेत. मतदान केले तर ते सन्‍मानाची वागणूक देणार का? असा सवाल पदाधिकार्‍यांनी उपस्‍थित केला

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ना. पाटील म्हणाले, १८ जूनच्या मतदानावेळी कोणती भूमिका घ्यायची, याबाबत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. प्रत्येकाने प्रामाणिक मत मांडले असून सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांची मते न जाणून घेता महायुतीच्या बैठकीला गेलो असतो, तर चुकीचा संदेश गेला असता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारले असता ना. पाटील म्हणाले, पाचगणी नगरपालिकेच्या कामानिमित्त मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली होती. योगायोगाने पालकमंत्री शंभूराज देसाई तेथे आले होते. मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र बोलावले आणि त्यावेळी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. ज्‍यावेळी आम्‍ही महायुती म्‍हणून काम करतो, त्‍यावेळी महायुतीचे उमेदवार निवडून येणारच ना,, असेही ना. पाटील यांनी स्‍पष्‍ट केले. पक्षातील फुटीर सदस्‍यांबाबत बोलताना ना. पाटील म्‍हणाले, जे सदस्य माझ्या चिन्हावर निवडून आले आणि नंतर पक्ष सोडून गेले, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नसल्‍याचे त्यांनी स्‍पष्‍ट केले.

भाजपच्या कराड येथील बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ना. जयकुमार गोरे यांनी केली होती. मात्र, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्याशिवाय मी कोणतीही भूमिका मांडू शकत नाही, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले होते. आता निवडणुकीत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मला दिले आहेत.
- ना. मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news