Satara Politics: जिल्ह्यात भाजप - राष्ट्रवादी संघर्ष विकोपाला

जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी महायुतीतच भडका; अनेक गटांमध्ये हायव्होल्टेज लढती
Satara Politics
Satara Politics: जिल्ह्यात भाजप - राष्ट्रवादी संघर्ष विकोपालाPudhari
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी-भाजप तसेच भाजप-शिवसेना असा संघर्ष उफाळला आहे. निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचला आहे. भाजप विरोधात राष्ट्रवादी हा संघर्ष विकोपाला पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या घटनेतून राष्ट्रवादी पक्ष अजूनही सावरला नसला तरी स्थानिक नेत्यांनीच प्रचाराची धुरा हाती घेतलेली पाहायला मिळत आहे, तर भाजपच्या व शिवसेनेच्या मंत्र्यांनी संपूर्ण मतदारसंघात आक्रमक चाली ठेवल्याने अनेक गटांमध्ये हायव्होल्टेज लढती होत आहेत. सातारा जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी डाव-प्रतिडाव रंगले आहेत.

सातारा जिल्ह्यात भाजपने शिस्तबद्ध प्रचारयंत्रणा उभी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकमेकांशी ट्युनिंग ठेवत संपूर्ण जिल्ह्यात प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा विकास घडवण्यासाठी जिल्हा परिषद ताब्यात द्या, असे आवाहन हे दोघेही करताना दिसत आहेत. त्यांना भाजपमधून खा. उदयनराजे भोसले, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, सातारा, खटावमध्ये महेश शिंदे, निवडणूक प्रभारी धैर्यशिल कदम, मदनदादा भोसले, सत्यजितसिंह पाटणकर यांची स़ाथ मिळत आहे आणि भाजप एकत्रित व संतुलित प्रचार यंत्रणेद्वारे जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी तळागाळात जोरदार खिंड लढवताना दिसत आहे.

दुसऱ्या बाजूने जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाची सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. अजितदादांनी सातारा जिल्हा परिषदेसाठी योगदान दिले आहे. जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील व खा. नितीनकाका पाटील राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकांड्या शिलेदाराप्रमाणे खिंड लढवताना दिसत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशाच आक्रमक लढती आहेत. शिवसेनेतून पालकमंत्री शंभूराज देसाई आपला गड शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस, शिवसेना उबाठा, रिपाइं व अन्य पक्ष संघटना आपल्या हक्काच्या मतदार संघात लढत देताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील हेवीवेट लढतींमध्ये सर्वात मोठी लढत शिरवळ गटात राष्ट्रवादीचे उदय कबुले, भाजपचे नितीन भरगुडे पाटील व शिवसेनेचे प्रदीप माने अशी आहे.भाजपने भरगुडे-पाटील यांना ऐनवेळी आपल्याकडे खेचत उमेदवारी दिल्याने या गटात राजकीय रंगत वाढली आहे. खेड बुद्रूक गटात शिवसेनेकडून नंदकुमार घाडगे, भाजपकडून ऋषिकेश धायगुडे, राष्ट्रवादीकडून गणेश धायगुडे व वंचित आघाडीकडून सुरेश जावळे असा चौरंगी सामना होणार असून मतविभागणीचा कुणाला फायदा होणार? याची चर्चा सुरु झाली आहे.

माण तालुक्यातील आंधळी गटात शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे व राष्ट्रवादीच्या दिपाली जगदाळे यांच्यात लढत रंगली आहे. या गटात शेखर गोरे यांनी ताकद लावली आहे. ना. जयकुमार गोरे यांच्यासाठीही ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. मार्डी गटामध्ये स्व. आमदार सदाशिवराव पोळ यांच्या दोन्ही सुना एकमेकांविरोधात उभ्या राहिल्याने घरातच काँटे की टक्कर होणार आहे. सोनाली मनोजकुमार पोळ यांना राष्ट्रवादीने तर भारती संदीप पोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या गटात जिंकणार पोळ आणि हरणारही पोळच असे चित्र असले तरी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांपैकी कोण वरचढ ठरणार? हे पहाण्याजोगे ठरणार आहे. कुकुडवाड गटामध्ये सप्तरंगी लढत होणार आहे. या गटात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असल्याने भाजपने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण गोरे यांना उभे केले आहे.

शिवसेना शिंदे गटाने सुरेश गोरड यांना तर काँग्रेसने महेश कर्चे यांना उभे केले आहे. येथे मोठ्या प्रमाणामध्ये मतांची विभागणी होणार आहे. या गटात पैशांचा महापूर सुरू असून अनेक बडे टगे निवडणुकीत उतरले आहेत. रोज वादावादी व हाणामारी या गटात सुरू आहे. पैशाचे जोरदार वाटप सुरू असल्याच्या चर्चा आहेत. निवडणूक आयोगाचे या जिल्हा परिषद गटाकडे अजिबात लक्ष नाही अशी परिस्थिती आहे. या जिल्हा परिषद गटात दोन्ही उमेदवारांनी मताला रेट काढला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दोघांनाही रेटावे, अशी मागणी या गटातील सर्वसामान्य जनतेने केली आहे.

महाबळेश्वरमध्ये तळदेव, भिलार या दोन्ही गटांमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये झटापट सुरु आहे. तळदेव गटात शिवसेनेचे अजित सपकाळ व राष्ट्रवादीकडून लढणारे संजय गायकवाड यांच्यात लढत आहे. भाजपने सुभाष सोंडकर यांना उमेदवारी दिली असली तरी खरा सामना शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यातच रंगला आहे. भिलार गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो फोडण्यासाठी भाजपने रान उठवले आहे. राष्ट्रवादीने संजय केळगणे यांना उमेदवारी दिली असून भाजपतर्फे रंजना कदम तर शिवसेनेतर्फे प्रदीप चपटे यांची उमेदवारी आहे. या गटात भिलार गणातील लढत अटीतटीची होणार आहे. बाळासाहेब भिलारे यांचे घर काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

फलटणमधील तरडगाव, साखरवाडी, विडणी, गुणवरे, वाठार निंबाळकर, हिंगणगाव या गटांमध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचा राजेगट विरुध्द माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटामध्येच खरी लढत आहे. या गटामध्ये राजेगटाने दिवंगत आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली आहे. तर त्यांना शह देण्यासाठी भाजपने रणजितसिंहांचा उजवा हात जयकुमार शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. या गटात रासपने काशिनाथ शेवते, शिवसेना उबाठाने अभिजित कदम, बसपाने प्रदीप मोरे व अपक्ष राजेंद्र चोरमले असे सहा उमेदवार रिंगणात असून रासप कुणाचे मतदान खाणार? यावर येथील जयपराजयाचे गणित ठरणार आहे.

जावलीमध्ये म्हसवे, कुडाळ, कुसुंबी या तिन्ही गटांमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. म्हसवे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपजिल्हा प्रमुख संदीप पवार यांना उभे केले आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना उमेदवारी दिली असल्याने या दोघांतच टक्कर रंगली आहे. या ठिकाणी अपक्षानेही नशीब आजमावले असून ना. एकनाथ शिंदे आणि ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी ही लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. कुडाळ गटात जयश्री गिरी (भाजप), पूनम नायकुडे (राष्ट्रवादी) या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कारण हा गट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावेदार आहे. येथे ना. शिवेंद्रराजे भोसले आणि आ. शशिकांत शिंदे या दोघांनीही आपली राजकीय ताकद लावली आहे. तर कुसुंबी गटामध्ये भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्या पत्नी कविता ओंबळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने रंगत वाढली आहे.

सातारा तालुक्यातही राष्ट्रवादी व भाजपमध्ये संघर्ष उफाळला आहे. ना. शिवेंद्रराजे, खा. उदयनराजे यांच्याविरोधात आ. शशिकांत शिंदे यांचा संघर्ष यावेळी पहायला मिळणार असला तरी ना. मकरंद पाटील, खा. नितीनकाका पाटील हे आ. शिंदे यांची साथ द्यायला उभे राहिले आहेत. पाटखळ गटामध्ये राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव यांच्याविरोधात भाजपच्या गौरी नलावडे उभ्या असून गितांजली कदम यांनी अपक्ष उमेदवारी लढली आहे. नलावडे आणि कदम या दोघीही खा. उदयनराजे यांच्या निकटवर्तीय आहेत. लिंब गटामध्ये अजिंक्यतारा कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव सावंत यांच्या खांद्यावर ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपची उमेदवारी सोपवली आहे. राष्ट्रवादीने राजेंद्र लावंगरे यांना संधी दिली आहे.

रिपब्लिकन सेनेकडून विशाल भोसले उमेदवारी करत आहेत. खेड गटामध्ये राष्ट्रवादीचे कामेश कांबळे आणि भाजपचे संदीप शिंदे यांच्यातच खरी लढत आहे. तसेच वंचितचे अमोल गंगावणे, रिपब्लिकन सेनेचे स्वप्निल हराळ यांच्यामुळे मतविभागणी होणार आहे. या गटात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आ. महेश शिंदे यांनी या गटात संदीपभाऊ शिंदे यांना उमेदवारी दिली आहे तर कामेश कांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी आहे. या गटात शिवेंद्रराजेंचे सातारा शहरातील कार्यकर्ते कामेश कांबळे यांचे काम करताना दिसत असल्याने महेश शिंदे नाराज असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news