

वेलंग : वाई तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देणारी घडामोड समोर आली आहे. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी व माजी मंत्री स्व. मदनराव आप्पा पिसाळ यांच्या कुटुंबाने भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, दि. 18 रोजी माजी जि.प. अध्यक्षा सौ. अरुणादेवी पिसाळ, त्यांचे पती शशिकांत पिसाळ या दाम्पत्यासह त्यांचे कुटुंब भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत.
रविवारी होणाऱ्या सोहळ्यात अरुणादेवींसह माजी जि.प. कृषी सभापती व सूतगिरणीचे व्हा. चेअरमन शशिकांत पिसाळ, युवा नेते ॲड. विजयसिंह पिसाळ, दीप्ती पिसाळ आणि जितेंद्र पिसाळ हे जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. पिसाळ कुटुंबाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अरुणादेवी पिसाळ यांनी 2024 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांच्यासाठी खा. शरद पवार यांनी सभा घेतली होती. पिसाळ कुटुंब हे गेली अनेक वर्षे शरद पवार यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. राष्ट्रवादीत असताना या कुटुंबातील अनेकांनी विविध पदे भूषवली आहेत.
अरूणादेवींचे सासरे चार वेळा आमदार व मंत्री राहिले असून, स्वतः अरुणादेवी पिसाळ या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. बावधन गट व गणात त्यांची मजबूत पकड असून, याच गणातून त्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. शशिकांत पिसाळ हे देखील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती असून, त्यांनी बावधन गणातून निवडणूक लढवून प्रभावी कामकाज केले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने, पिसाळ कुटुंबाच्या प्रवेशामुळे वाई तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पिसाळ कुटुंबाच्या भाजप प्रवेशामुळे वाईच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.