सातारा | बाजारबुणग्यांसह जयंत पाटलांनी भरवला बोरीचा बार

आ. जयकुमार गोरे; माण-खटावच्या विकासाबद्दल एक अवाक्षरही काढले नाही
Satara News
बाजारबुणग्यांसह जयंत पाटलांनी भरवला बोरीचा बार Pudhari
Published on
Updated on

खटाव : जलसंपदा मंत्री असताना ज्या जयंत पाटलांनी माण खटावचौ एकही नवी पाणीयोजना मंजूर होवू दिली नाही, आंधळी उपसासिंचन योजनेचे टेंडर रखडवले, फडणवीसांनी २०१९ मध्ये घेतलेला फेरजलनियोजनाचा निर्णय लांबवला, माण-खटावच्या विकासाचा विचार न करता कायम इथल्या आमदाराचा पराभव करण्याचे प्रयत्न केले. त्या जयंत पाटलांना माझ्यावर आणि माण खटाववर बोलण्याचा अधिकार नाही.

राज्याचे नेते असलेल्या जयंतरावांनी शेजारी बसलेल्या बाजारबुणग्यांच्या सांगण्यावरुन गल्लीबोळातले विषय घेऊन मला शिव्या देण्याचा एककलमी बोरीचा बार भरवला, असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी केला. पत्रकारांशी बोलताना आ. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, मी आमदार होणे किंवा न होणे महत्वाचे नव्हते तर माण- खटावचा पाणीप्रश्न सुटणे महत्वाचे होते. जयंतराव, त्यांचा पक्ष आणि त्यांच्या रिकामटेकड्या सहकाऱ्यांनी पाणीप्रश्नासाठी काहीही न करता फक्त जयकुमारचा पराभव करण्याचेच प्रयत्न केले. पाणी योजनांवर फोकस न करता बारामती, फलटणकरांसह जयंतरावांनी मला रोखण्यातच धन्यता मानली. जयंतराव फार कर्तृत्ववान आहात तर जो माझ्या नादी लागलाय, त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाय... निवडणूक दीड महिन्यावर आली असताना एका चिल्लरला माझा कार्यक्रम करायला तीन महिने लागणार आहेत.

आजपर्यंतचा इतिहास पहाता माझ्या नादाला लागणाऱ्याचाच करेक्ट कार्यक्रम झालाय हे ध्यानात ठेवावे. जे रामराजे पृथ्वीच्या अंतापर्यंत माण खटावला पाणी येणार नाही अशी वक्तव्ये करायचे त्या रामराजेंची तरफदारी करणाऱ्याला लाज आणि शरम वाटली पाहिजे. आपले गाव पाण्यापासून वंचित आहे याचेही त्याला भान राहिले नाही. ज्यांनी भाषणे केली त्यांच्या गावात जयकुमारने पाणी आणले आहे किंवा लवकरच येणार आहे. सगळी चिल्लर सलाईनवरची आहे. निवडणूक संपली की त्यांचे सलाईनही संपणार आहे, असेही आ. गोरेंनी सांगितले.

इथला पाणीप्रश्न तडीस लावायला हवा होता. मी निष्क्रिय आहे की सक्रिय ते जनतेला चांगले माहित आहे. मी तुमच्याकडे लक्ष न देता माझ्या माण- खटावचा पाणीप्रश्न मार्गी लावत राहिलो आणि तुम्ही मला अडचणीत आणायचे प्रयत्न करत राहिला. मी विविध योजनांचे पाणी आणून, नवीन योजनांसाठी निधीची तरतूद करुन निरंतर प्रयत्नशील राहिलो आहे. त्यामुळे मला सारख्या नतद्रष्टाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आ. गोरे पुढे म्हणाले, कोव्हिडबाबत कोटनि काय निर्देश दिले आहेत ते एकदा पहा. चौकशीचा अहवाल समोर आल्यावर ते तुम्हाला समजेलच. खोटी कागदपत्रे तयार करुन तुम्ही कोविड हॉस्पिटल आणि म. फुले जन आरोग्य योजना तुम्ही बंद पाडली.

कोरोनात हजारो रुग्णांना बेड मिळत नव्हते तेव्हा तुम्ही सगळे कुठे होता? आम्ही ज्या रुग्णांवर उपचार केलेत त्यांच्या भावना आणि आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. जयकुमारने कोविड काळात काय केलेय ते उपचार घेतलेल्या रुग्णांना चांगलेच माहीत आहे. तुम्ही त्या बाबतीत न्यायाधीश होऊ नका. तुमच्या सरकारमध्ये माती आणि वाळू कुणी चोरली. त्यामुळे तहसीलदार निलंबित झाले होते हे सर्वांना माहित आहे.

जयंतराव शेजारी बसलेल्या बिनकामाच्या औलादींच्या सांगण्यावरुन भाषण करतात आणि स्वतःला राज्याचे नेते म्हणवतात. जबाबदारीने वक्तव्ये करताना वस्तुस्थितीची माहिती घ्यायची सवय पाटलांनी लावून घ्यायला हवी. त्यांनी आणि त्यांच्या सरकारने नवीन पाणीवापराला, इथल्या औद्योगिक वसाहतीला, पाणी योजनांना विरोध का केला याची उत्तरे जयंतरावांनी द्यायला पाहिजे होती. त्यांनी आणि त्यांच्या चिल्लर सहकाऱ्यांनी फक्त जयकुमारला शिव्या द्यायचा बोरीचा बार भरवला, असा टोलाही त्यांनी लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news