

पिंपोडे बुद्रुक : गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाठार स्टेशन पोलिसांनी मोहीम राबवून ६ लाख १५ हजार रुपये किमतीचे २५ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले आहेत. या कारवाईत वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकूण २५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यांची किंमत ६ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. वाठार पोलिस आणि सायबर पोलिसांनी तांत्रिक माहिती महाराष्ट्रासह परराज्यात संपर्क साधून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे, तानाजी चव्हाण, उदय जाधव, प्रकाश चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतीक देशमुख, आशा देशमुख आणि सातारा सायबर पोलिसांनी ही कारवाई केली.