

कराड : कधी टाईमरमध्ये बिघाड... कधी सिग्नलवर दाखवली जाणारी चुकीची दिशा अन् अनेकदा दोन - दोन आठवडे दुरूस्तीअभावी बंद असणारे सिग्नल अशी परिस्थिती कराड शहरातील सिग्नल यंत्रणेची आहे.
वाहतूक पोलिसांकडून अनेकदा पत्र व्यवहार करूनही नगरपालिका प्रशासनाकडून दुरूस्तीबाबत होणारी दिरंगाई वाहतूक व्यवस्थेच्या मुळावर उठत आहे. त्यामुळेच सिग्नल यंत्रणेची देखभाल व दुरूस्ती करण्याचे अधिकार निधीसह पोलिस प्रशासनाला देणे आवश्यक बनले आहे.
कराडमध्ये वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून कृष्णा नाका, कॉटेज हॉस्पिटल, विजय दिवस चौक, बसस्थानक परिसर, पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक अशा ठिकाणी नगरपरिषदेच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र कृष्णा नाका, भेदा चौक, बसस्थानक परिसरात अनेकदा सिग्नल यंत्रणा आठवडा - आठवडाभर बंद असलेली पहावयास मिळते. मागील वर्षी कृष्णा नाका परिसरातील सिग्नल यंत्रणा जवळपास 20 दिवसाहून अधिक काळ बंद होती. त्यानंतर दुरूस्ती करण्यात येऊनही शहराच्या विविध चौकातील सिग्नल यंत्रणेत काही ना काही बिघाड झालेला पहावयास मिळतो. केवळ कृष्णा नाकाच नव्हे तर शहरातील अन्य ठिकाणच्या सिग्नलची अशीच परिस्थिती आहे.
पालिका प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेवर 10 टक्के खर्च करावा, अशी सूचना सुमारे 11 वर्षापूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंदी पाटील यांनी एका कार्यक्रमात केली होती. मात्र असे असले तरी पालिका प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थेवर 10 टक्के खर्च केले जातात का ? हा संशोधनाचाच विषय आहे. पालिका प्रशासनाला अनेकदा पत्र व्यवहार करूनही वाहतूक पोलिसांना अपेक्षित रिप्लाय मिळत नाही. त्यामुळेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळेच सिग्नल यंत्रणा दुरूस्तीचे अधिकार पालिका प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांकडे हस्तांतरित केले जाणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक निधीही वाहतूक पोलिसांना देणे काळाची गरज आहे.