

सातारा : राज्य सरकारकडून पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला असताना सातारा वगळून राज्यात सर्वत्र पोलिस भरती होणार असल्याचे समोर आले. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर पोलिस भरतीची तयारी करणारे सातार्यातील युवक एकत्र आले. त्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधी यांना भेटून निवेदने देत सातार्यातही पोलिस भरती व्हावी, असा एल्गार केला आहे.
मंत्री मंडळाने गेल्या 20 दिवसांपूर्वी राज्यात 15 हजार पोलिस भरतीची घोषणा केली. 2024 मध्ये रिक्त असलेल्या व 2025 मध्ये रिक्त होणार्या पदांचा आढावा घेवून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार राज्यात 10 हजार 908 पोलिस शिपाई, 234 पोलिस शिपाई चालक, 25 बॅन्ड्स मॅन, 2 हजार 393 सशस्त्र पोलिस शिपाई व 554 कारागृह शिपाई अशी पोलिसांची पदे भरली जाणार आहेत. ही सर्व पदे क संवर्गातील आहेत. पोलिस भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, त्यानंतर लेखी, मैदानी प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोणत्याही क्षणी पोलिस भरतीची जाहीरात प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.
तब्बल 15 हजार पोलिसांची भरती होणार असल्याने राज्यातील सर्वच जिल्ह्यातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुर्देवाने मात्र सातार्यातील पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण राज्यभरात सर्व जिल्ह्यात पोलिस भरतीचे कुठे, किती जागा सुटणार आहेत याची आकडेवारी प्रसिध्द झाली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पुढे मात्र 0 (शून्य) जागा भरल्या जाणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे सातार्यातील युवक-युवती हवालदिल झाले आहेत.
सातार्यात पोलिस भरतीची प्रक्रिया राबवली जावी यासाठी पोलिस भरती करणारे युवक एकत्र आले. दैनिक ‘पुढारी’ने दि. 20 ऑगस्ट रोजी पोलिस भरतीचे वृत्त प्रसिध्द केल्याने आभार मानले. बेरोजगारी तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस भरतीची तयारी करत असल्याने सातारा पोलिस भरती व्हावी, अशी कैफियत त्यांनी मांडली. तसेच पोलिस भरतीसाठी जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाल्यास पोलिस भरती प्रक्रिया सातार्यात राबवली जावू शकते. यामुळे राज्य शासनाने सातारा पोलिस भरती घ्यावी, अशी मागणी केली आहे.