

सातारा : सातारा पोलिस दलात सेवा बजावणारा पोलिस त्याच्या मित्रांसह गुटखा, तंबाखू खाऊन थुंकून घाण करत होता. त्यामुळे त्याला एका नागरिकाने अटकाव केल्यानंतर संबंधित पोलिसाने मुजोरगिरी केली. घाणेरड्या शिवीगाळ करून अटकाव करणार्या नागरिकाच्या कारची काच फोडून दहशत निर्माण करत मारहाण केली. तसेच, घरावर लाथा मारून दोन महिलांना अश्लील शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर प्रतीक संतोष दळवी (वय 22, रा. सातारा) या पोलिसासह त्याच्या अनोळखी तीन मित्रांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 1 ऑगस्ट रोजी सातारा शहर परिसरात घडली आहे. प्रतीक दळवी सध्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात रुजू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित पोलिस त्याच्या मित्रासह गुटखा, तंबाखू खावून थुंकत होता. यावेळी परिसरात राहणार्या एका व्यक्तीने संबंधितांना घाण करु नका, असे सांगितले. यावेळी पोलिस प्रतीक दळवी याने अटकाव करणार्याला शिवीगाळ केली. तसेेच अटकाव करणार्याची कार दगड घालून फोडली. यामध्ये साधारण 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयित पोलिसाने अटकाव करणार्याच्या घरावर लाथा मारल्या. दार उघडून तो घरात घुसला आणि दोन महिलांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच अटकाव करणार्याला मारहाण केली. पोलिसाच्या या सर्व कृत्याने संबंधित कुटुंबिय हादरुन गेले. अखेर सातारा शहर पोलिस ठाण्यात संशयीत पोलिसाविरोधात विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारदारांचा तेथे गाळा आहे. संशयित पोलिस कायम तेथे मित्रांसोबत बसतो आणि गुटखा, तंबाखू खाऊन थुंकतो. यामुळे तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांनी याअगोदर देखील गाळ्याजवळ थुंकून घाण करू नका, असे सांगितले होते. मात्र, संशयित पोलिस संबंधित कुटुंबाला कायम अरेरावी करत होता, असे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.