Satara Encounter: सातारा पोलिसांकडून दरोडेखोराचा एन्काऊंटर

शिक्रापूर येथील थरारक घटनेत 2 पोलिसही जखमी; साथीदार जेरबंद
Satara Encounter |
Satara Encounter: सातारा पोलिसांकडून दरोडेखोराचा एन्काऊंटरPudhari
Published on
Updated on

सातारा/पुणे/शिक्रापूर : तीन दिवसांपूर्वी सातार्‍यातील मेडिकल कॉलेज परिसरात कोयत्याचा धाक दाखवून महिलेचे चेन स्नॅचिंग करणार्‍या लखन पोपट भोसले (वय 32, रा. जयरामस्वामी, वडगाव, ता. खटाव, जि. सातारा) या कुख्यात गुन्हेगाराचा सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला. शिक्रापूर (जि. पुणे) येथे शनिवारी सायंकाळी 7 वाजता हा थरार घडला.

लखन भोसले व त्याच्या साथीदाराने पोलिसांवर कुकरीने वार केल्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यामध्ये लखनचा खात्मा झाला असून या घटनेत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, लखनच्या साथीदाराला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. अमर धुलाप्पा केरी (रा. आसगाव, ता. जि. सातारा) असे जेरबंद केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी : सातारा शहरात तीन दिवसांपूर्वी मेडिकल कॉलेज परिसरात महिलेचा पाठलाग करून तिला कोयत्याचा धाक दाखवून चेन स्नॅचिंग केले होते. याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या घटनेअगोदरही सातार्‍यात सलग चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. यामुळे सातारा शहर ऐन सणासुदीमध्ये हादरून गेले.

सातार्‍यात दहशत माजवणार्‍या चेन स्नॅचरचा तपास करताना सातारा शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभाग (डीबी) कमालीचा अलर्ट झाला होता. ही टीम चेन स्नॅचरचे वर्णन घेऊन त्यांचा शोध घेत होती. सातार्‍यातील चेन स्नॅचिंगमधील काही संशयित शिक्रापूर (जि. पुणे) येथे असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पो.नि. राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, पोलिस हवालदार सुजित भोसले, तुषार भोसले, सागर गायकवाड असे पोलिसांचे पथक शिक्रापूर येथील मलठण फाटा येथे पोहचले. त्या परिसरात वीटभट्टी व रहिवासी नागरिकांची सोसायटी देखील आहे. या परिसरात संशयित दोघे असल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला.

शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तो परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही चोरटे पोलिस ज्या ठिकाणी शोध घेत होते त्याच्या दोन्ही बाजूला हे चोरटे असल्याचे त्यांना दिसले. यामुळे पोलिसांच्या दोन टीम दोन्ही बाजूला गेल्या. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना थांबण्याचा इशारा केला. मात्र त्यातील लखन भोसले याने अचानक कुकरी काढून पोलिस हवालदार सुजीत भोसले यांच्यावर चाल केली. पोलिसाने हाताने पहिला वार अडवला मात्र त्यात ते जखमी झाले. लखन याने दुसरा वार भोसले यांच्या छातीवर केला. अवघ्या काही क्षणात कुकरीचा वार झाल्याने पोलिस गंभीर जखमी झाले. या थरारकप्रसंगी पोलिस सुजीत भोसले यांनी त्यांच्याकडे असलेली बंदूक स्वसंरक्षणासाठी काढली. तरीही लखन भोसले त्यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी चालून गेला. त्यामुळे अखेर त्यांनी फायरिंग केले. त्यामध्ये लखन गंभीर जखमी झाला.

हा थरार परिसरातील नागरिकांनी देखील अपार्टमेंटवरुन पाहिला. चोरटे पोलिसांवर बेछूट तुटून पडत होते, हल्ला करत होते. यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अखेर फायरिंग केले. तोपर्यंत सातारा शहर पोलिसांच्या दुसर्‍या पथकाने लखन भोसले याच्या साथीदाराला जेरबंद केले. फायरिंगच्या या घटनेची माहिती सातारा पोलिसांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. जखमी पोलिसाला व लखन भोसले यालाही तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र लखन भोसले याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयीन सुत्रांनी सांगितले. सातारा-पुणे सीमेवर पोलिस-गुंडांमध्ये चकमक झाल्याचे समजल्यानंतर राज्यात खळबळ उडाली.

घटनास्थळी स्थानिक पोलिस, गुन्हे अन्वेषणचे पोलिस इतर विभागातील पोलिस पोहचले. पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळ सील केले. घटनास्थळाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.

लखन भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे

लखनऊर्फ महेश पोपट भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 22 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दहिवडी, म्हसवड, वडगाव निंबाळकर, बारामती तालुका, इंदापूर, वडूज पोलिस ठाण्यात त्याच्यावर हे गुन्हे दाखल आहेत. लखन भोसले याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाईदेखील केली होती. 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या होत्या. सध्या तो जामिनावर बाहेर होता, अशी माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news