

सातारा : पुढारी वृत्तसेवा
मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुसक्या सातारा पोलिसांनी आवळल्या. पोलिसांनी या टोळीतील इचलकरंजी व साताऱ्यातील ७ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ पिस्टल, कोयता, जिवंत काडतुसे असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा नीलेश हा मुख्य सूत्रधार असून, त्याने या टोळीला २० लाखांची सुपारी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Germany Gang)
अनुज चिंतामणी पाटील (वय २१), दीप भास्कर मालुसरे (वय १९), क्षितिज विजय खंडाईत (तिघे रा. गुरुवार पेठ, सातारा), आनंद शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय २५, रा. हनुमाननगर, इचलकरंजी), अक्षय अशोक कुंडूगळे (वय २५, रा. जवाहरनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर), नीलेश वसंत लेवे (रा. चिमणपुरा पेठ, सातारा), विशाल राजेंद्र सावंत (रा. टिटवेवाडी, ता. सातारा) अशी अटक केलेल्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
संशयित अनुज पाटील याने पोलिसांना सांगितले की, विधानसभा निवडणूक सुरू असताना दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी नीलेश लेवे व पप्पू लेवे या दोघा चुलत भावांची भांडणे झाली होती. त्यावेळी नीलेशचे वडील वसंत लेवे (आण्णा) यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारले होते. याचाच राग मनात धरून नीलेश लेवे याने संशयित अनुज पाटील याला धीरजचा गेम करण्यासाठी २० लाखांची सुपारी दिली.