

सातारा : नागरिकांच्या बँक खात्यांची माहिती, एटीएम, डेबिट कार्ड, यूपीआय व इंटरनेट बँकिंगची माहिती विकणार्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला. सायबर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई करत कोरेगावातील चौघांना गजाआड केले. पोलिसांनी संशयितांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सलमान मुनीर शेख (वय ३०), अफताब फिरोज पठाण (वय २५), आदित्य शिवाजी माने (वय २५), अनिकेत अतुल कदम (वय २७, सर्व रा. कोरेगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी सायबरच्या पोलिस सुप्रिया रोमन यांनी तक्रार दिली आहे.
दि. २० ऑगस्ट रोजी कोरेगावमधील तीळगंगा नदीच्या पुलावर ही कारवाई करण्यात आली. सायबर चोरीच्या पार्श्वभूमीवर चोरटे माहितीची अफरातफर करत असल्याची माहिती सायबरचे पोलिस ओंकार डुबल यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक करून सापळा लावला. कोरेगाव येथे घटनास्थळी पोलिसांना संशयित चौघे दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळत गेली.
संशयित नागरिकांच्या बँक खात्यांची माहिती, एटीएम, डेबिट कार्ड, यूपीआय, इंटरनेट बँकिंगची माहिती व इतर आर्थिक साधने म्यूल अकाऊंट म्हणून मिळवत होते. ही सर्व माहिती पुढे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी उपलब्ध करून देत होते. यासाठी संशयितांना दीड ते तीन टक्के कमिशन मिळत होते.
यातून भारतातील अनेक राज्यांतील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक होत होती, हे पोलिस तपासात समोर आले. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. राजेश माळी, सुप्रिया रोमन, संदीप पाटील, ओंकार डुबल, रणजित कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे, पवार यांनी सहभाग घेतला.