

फलटण : घरातील कुटुंबीय झोपलेले असताना पिस्तूल आणि धारदार कोयत्यांसह चौघांनी घरात घुसून कुटुंबप्रमुखाच्या डोक्याला पिस्तुल लावून मारहाण केली. त्यानंतर २० हजार रुपयांची रोकड व एक तोळे मंगळसूत्र काढून घेतले. एवढ्यावरच न थांबता घरातील तरुणीचे तोंड बांधून तिचे जबरदस्तीने चारचाकीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना आसू (ता. फलटण) येथील शिंदेनगर परिसरात शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. तक्रार दिल्यास मुलीला ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शहाबाज शेख, समिर आतार (पूर्ण नाव माहीत नाही), सद्दाम शेख (सर्व रा. बारामती, जि. पुणे) आणि अमिर पठाण (पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. राजेंद्र मल्हारी निंबाळकर (वय ५५, रा. शिंदेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौघे अचानक निंबाळकर यांच्या घरात घुसले. चौघांनी निंबाळकर यांची मुलगी प्रीती हिला पकडून तिचे तोंड बांधले आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिला घराबाहेर ओढत नेले. त्यानंतर तिला चारचाकीतून बसवून चौघे निघून गेले.