

पाटण : कोयना धरणातील कमी होत चाललेला जलसाठा, वाढती पाणीगरज आणि जलविद्युत निर्मितीवरील मर्यादा यामुळे पाटण तालुक्यात पवन व सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याची गरज असल्याची मागणी स्थानिकांमधून जोर धरत आहे. यावर्षी मे महिन्यापासून जुलैपर्यंत कोयना धरणातील पाण्यावर अवलंबून असलेली जलविद्युत निर्मिती बंद होती, तर सिंचनासाठीही पाणीपुरवठ्यावर निर्बंध आले होते.
पाटण परिसरात प्रचंड वाऱ्याचा वेग आणि कडाक्याचे ऊन ही नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असतानाही पवन व सौर प्रकल्पांना अपेक्षित चालना मिळत नसल्याची टीका होत आहे. जलसंपदा विभाग, महानिर्मिती, टाटा पॉवर आणि आवाडा यांच्यात ५,६३० मेगॅवॅट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी २४,६३२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत. मात्र पाण्यावर वाढत्या ताणाच्या परिस्थितीत अशा प्रकल्पांच्या प्राधान्यक्रमाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
अभ्यासकांच्या मते, पवन व सौर ऊर्जेला चालना दिल्यास स्थानिक रोजगार वाढू शकतो, विजेचा तुटवडा कमी होऊ शकतो आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्यावरचा दबाव घटू शकतो. जुन्या पवनचक्क्यांच्या जागी अधिक क्षमतेचे नवे टॉवर उभारण्यास कायदेशीर व पर्यावरणीय अटी अडथळा ठरत असल्याने उद्योग इतर राज्यांकडे वळत असल्याची खंतही व्यक्त होत आहे. शासनाने पाणीटंचाईचे वास्तव लक्षात घेऊन अपारंपारिक ऊर्जेच्या सर्व पर्यायांचा संतुलित व सकारात्मक विचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.