

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते पाचवड रस्त्यावर घडणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. अपघाताचे प्रमुख केंद्र म्हणून या महामार्गाची नव्याने ओळख होऊ लागली आहे. रस्ते विकास महामंडळाच्या काही चुकीच्या धोरणामुळे या मार्गावर घडणाऱ्या अपघातात मनुष्यहानी होत आहे. दररोज या मार्गावर घडणारे अपघात पाहता संबंधित यंत्रणेने या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपायोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
दैनिक ‘पुढारी’ने याबाबत पुढाकार घेत रस्ते महामंडळाच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढले आहेत; परंतु गांधारीच्या भूमिकेत सुस्त असलेल्या यंत्रणेला अद्याप जाग आलेली नाही. वास्तविक या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असल्याने या मार्गावरील सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे हे संबंधित यंत्रणेचे खरे कर्तव्य आहे. दररोज या मार्गावर घडणाऱ्या अपघातांमुळे मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होत आहे.
महामार्गावरील सुरक्षिततेची देखभाल करणारी यंत्रणाच कार्यरत नसल्याने हे जे दुष्परिणाम नागरिकांना व वाहनचालकांना भोगावे लागत आहेत. या मार्गावरील गेल्या पाच वर्षांपासून पोलिसगस्त वाहन हे बंद आहेत. तसेच रुग्णवाहिका वेळेत न आल्यानेही अपघातग्रस्तांवर वेळेत उपचार उपलब्ध होत नाहीत संबंधित विषयावर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनेही दिली आहेत.