

सातारा/परळी : जिल्ह्यात पश्चिमेकडे मान्सून पावसाने जोर पकडला आहे. मंगळवारी सातारा, वाई, जावली, पाटण, कराड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. परळी खोर्यात तर पावसाची संततधार सुरू असून उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी गावच्या डोंगरावरील मातीचा भराव निसटू लागला आहे. त्यामुळे भूस्लखन होऊन पायथ्याला असलेल्या शेतीचे नुकसान झाले. काही झाडेही उन्मळून पडली आहेत. दरम्यान, हवामान खात्याने सातारा जिल्ह्यात दि. 18 व 19 रोजी ऑरेंज तर 20 व 21 रोजी यलो एलर्ट दिला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिला. पश्चिमेकडील तालुक्यात सरीवर सरी कोसळल्या. अधूनमधून ऊन पडले; मात्र काळवंडलेले आभाळ कायम राहून पाऊस धो-धो कोसळला.
परळी खोर्यात या पावसाने हाहाकार उडवला आहे. डोंगरकपारीत दगडी निसटू लागल्या आहेत. ठोसेघर मार्गावर छोट्या दरडी कोसळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उरमोडी धरणाच्या पलीकडे असलेल्या कुरळबाजी डोंगरावर भूस्खलन होवू लागले आहे. त्यामुळे मातीचा भराव तसेच निलगिरीची झाडे उन्मळून पडली आहेत. येथील मातीचा भराव पायथ्याला असलेल्या शेतीत येऊ लागला असल्यामुळे शेतीसह शेतकर्यांचे नुकसान होत आहे. जगन्नाथ कुरळे, शंकर कुरळे, आनंद कुरळे यांच्या शेतीच्या रानात मातीचा भराव वाहून येऊ लागला आहे.
दरम्यान, मे महिन्याचा वळीव पाऊस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचा जोर वाढल्याने पश्चिमेकडे अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे या परिसरातील पेरण्याही खोळंबल्या आहेत.
धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणे भरण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सातारा 26.5 मि.मी., जावली 27 मि.मी., पाटण 42.2 मि.मी., कराड 20. 8 मि.मी., कोरेगाव 14.7 मि.मी., खटाव 23.1 मि.मी., माण 1. 7 मि.मी., फलटण 0.3 मि.मी., खंडाळा 0.7 मि.मी., वाई 10.3 मि.मी. आणि महाबळेश्वरमध्ये 30.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.