Satara Accident: चौघांच्या मृत्यूने परळी खोरे हेलावले

मृतांवर निमसोड व कवठे येथे अंत्यसंस्कार; जखमींची प्रकृती स्थिर
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

परळी : परळी खोऱ्यातील उरमोडी धरणालगत असलेल्या कामथी येथे शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला. या चारही जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. या दुर्घटनेने परळी खोरे हेलावून गेले आहे. निमसोड व कवठे या गावांवरही शोककळा पसरली आहे. दरम्यान, जखमी मायलेकाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

मालन सिताराम अडागळे (वय 50), लिलाबाई उत्तम अडागळे (56), कल्पना सागर आवळे (36), गार्गी सागर आवळे (6) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत मालन यांची मुलगी अर्चना सागर मोरे व अर्चना हिचा मुलगा अमेय सागर मोरे (4, दोघे रा. कवठे, ता. वाई) हे जखमी झाले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या दरम्यान आयशर ट्रकचा हँडब्रेक निघाल्याने अपघात झाला होता. प्रकल्पग्रस्त कामथी या गावातून नवीन गावठाणात हे कुटुंब स्थलांतर करत होते. तसेच त्यांच्या मुलाचे लग्नही येत्या 14 तारखेला होणार होते. त्याची तयारीही सुरू होती. यातच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मालन व लिलाबाई यांच्यावर निमसोड (ता. खटाव) येथे तर कल्पना व गार्गी यांच्यावर कवठे (ता. वाई) येथे अंत्यसंस्कार झाले.

आयशर ट्रकचा चालक बचावला

अपघातात आयशर ट्रकचा चालक श्रीकांत जगन्नाथ माने (वय 38) हाही जखमी झाला आहे. आयशर ट्रक उताराला उभा करण्यात आला होता. कुटुंब ट्रकमध्ये बसले असताना चालक गाडीतील साहित्याची बांधाबांध करत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपघातातून चालक श्रीकांत बचावला असून त्याच्या पायाला जखम झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news