

पाचगणी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पाचगणीत मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील विविध भागातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे एखादा अपघात झाल्यानंतरच बांधकाम विभाग जागा होणार का? की एखाद्याचा जी जायची वाट अधिकारी पाहत आहेत? असा सवाल होत आहे. पुढील काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे. त्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास अपघात होतील हे निश्चित. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकार्यांनी जागे होवून खड्डे भरून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.
पाचगणी शहरातील मुख्य रस्त्याला खड्डे पडल्याने ते वाहनचालकांसह आता विद्यार्थ्यांच्याही जीवावर उठण्याची शक्यता आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वार, पादचारी आणि पर्यटकांना यामुळे अपघातांचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्डे पाण्याने भरल्यास त्यांच्या खोलपणाचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे.
पाचगणीत आजूबाजूच्या परिसरातून येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थांची रोज ये-जा चालू असते. दुचाकीचा प्रवास हा नित्यनेमाचा असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. नारायण लॉज ते पाचगणी बस्थानाका दरम्यान जागोजागी रस्त्याची चाळण झाली आहे. वाईवरून पाचगणीत प्रवेश केल्यावर रस्त्यावरील खड्ड्यांनीच पर्यटकांचे स्वागत होत आहे.
पाचगणीत येणारा हा मुख्य रस्ता असूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खड्डेच खड्डे चोहीकडे असे चित्र असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याची केवळ मलपट्टी करण्याचे कामच अधिकारी करतात. त्यामुळे अधिकारी व ठेकेदारांचे काही साटेलोटे आहे का? असाही सवाल केला जात आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही निगरगट्ट झालेले अधिकारी कशाचीच दखल घ्यायला तयार नाहीत. यासाठी बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले व ना. मकरंद पाटील यांनीच कानउघडणी करणे गरजेचे आहे.
पाचगणीतील या मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. खासकरून दुचाकीचालकांना तोल सांभाळताना कसरत करावी लागते. अवजड वाहनेही येत असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. आता तर शाळा सुरू झाल्या असून अपघात होण्याचीही भीती आहे. यासाठी बांधकाम विभागाने यावर कार्यवाही करावी.
श्रीरंग शेलार स्थानिक