

पाचगणी : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने पाचगणीतील पाच हॉटेल्सची अचानक तपासणी केली. यामध्ये दोन हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने त्यांचे अन्न विक्री परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले.
अन्य तीन हॉटेल्सना अनियमिततेबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान राधा कृष्ण फूड कोर्ट (शॉपिंग सेंटर) आणि समर प्लाझा (खिंगर रोड) या हॉटेलमध्ये स्वच्छतेच्या त्रुटींसह मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळले. त्यामुळे प्रशासनाने दोन्ही हॉटेलचे परवाने निलंबित केले.
क्लिफ इन (नारायण लॉज परिसर), ब्लू कंट्री (खिंगर रोड) आणि फ्रेंच ट्रीट (शॉपिंग सेंटर) या हॉटेलमध्येही स्वच्छतेबाबत अनियमितता आढळल्याने नोटिसा बजावण्यात आल्या. या तपासणी पथकात पी. एन. वायकर, ए. ए. गायकवाड, सायली खपाने यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी होते. या कारवाईमुळे पाचगणीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.