

सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तहसिलदारांना आदेश देण्यात आले आहेत. दि. 14 जुलैपर्यंत हे आराखडे तयार होणार आहेत. काही तालुक्यातील जिल्हा परिषद गटांचे तसेच पंचायत समिती गणाचे कच्चे आराखडे तयार झाले असून ते निवडणूक शाखेकडे पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. यावेळी कायद्यात करण्यात आलेल्या बदलानुसार प्रभाग रचना तयार करण्याचे अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. त्यानुसार राज्याचा नगरविकास विभाग तसेच ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रभाग रचनांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संबंधित भागातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि आरक्षणाचे निकष लक्षात घेऊन प्रारूप आराखड्याचे काम सुरू केले आहे. प्रारूप प्रभाग आराखडा सादर करण्याची मुदत 14 जुलैपर्यंत आहे. जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये समाविष्ट झालेल्या गावांच्या अनुषंगाने संबंधित तालुक्यातील गट आणि गणांची रचना बदलणार आहे. अन्यथा बहुतांश तालुक्यातील गट आणि गणांचा आराखडा पूर्वीप्रमाणेच कायम राहण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाकडे सर्व तालुक्यांकडून प्रारूप आराखडा प्राप्त होताच त्याची तपासणी तसेच दुरुस्ती केली जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समितीच्या नोटीस बोर्डासह संकेतस्थळावर प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर 21 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे हरकती आणि सूचना सादर करण्यात येणार आहेत. त्या हरकतींनुसार जिल्हाधिकारी अभिप्रायासह दि. 28 जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत. दि. 11 ऑगस्ट पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी होवून निर्णय देण्यात येणार आहे. दि. 18 ऑगस्ट पर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांकडे सादर केला जाणार आहे.